आयआयटी : जमीन निश्चित करण्यासाठी समिती स्थापन

महसूल सचिव अध्यक्ष; तीन जागांचा पर्याय


03rd March 2021, 11:39 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात आयआयटी प्रकल्पासाठी जमीन निश्चित करण्यासंदर्भातील समितीची स्थापना राज्य सरकारने केली आहे. या समितीचे अध्यक्ष महसूल स​चिव आहेत. लवकरच यासंदर्भातील अधिसूचना जारी होणार आहे, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली.
आयआयटी प्रकल्पासाठीची जमीन निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत महसूल सचिवांसह दोन्ही जिल्हाधिकारी, शिक्षण सचिव, तंत्र शिक्षण संचालक तसेच सेटलमेंट व जमीन नोंद खात्याचे संचालक यांचा समावेश आहे. समितीसमोर राज्यातील तीन ठिकाणच्या जागांचे पर्याय आहेत, अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सरकारने आयआयटी प्रकल्पासाठी शेळ-मेळावली येथील जागा निश्चित केली होती. पण शेळ-मेळावली येथे आयआयटी प्रकल्प नकोच, असा पवित्रा घेत तेथील स्थानिक रस्त्यावर उतरले होते. स्थानिकांनी अनेक दिवस आंदोलन सुरू ठेवल्यानंतर सरकारने पोलिस बळ वापरून आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न केला होता. पण स्थानिकांनी माघार न घेतल्याने तसेच स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र पाठवल्यानंतर सरकारने आयआयटी प्रकल्प शेळ-मेळावली येथून इतर ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता या समितीची स्थापना करण्यात आली आहे.