टॅक्सी विषयात ‘पर्यटन’ची लुडबूड नको

मंत्री मायकल लोबो : प्रश्न लवकर निकाली काढण्याची मागणी


03rd March 2021, 11:38 pm
टॅक्सी विषयात ‘पर्यटन’ची लुडबूड नको

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : टॅक्सीवादावर आपण उपाय सांगितला आहे. स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या हितासाठी सरकारने पर्यटक टॅक्सीचा विषय त्वरित निकाली काढावा. हा विषय वाहतूक खात्याशी निगडित असून पर्यटन खात्याने यामध्ये लुडबूड करू नये, असा सल्ला मंत्री मायकल लोबो यांनी दिला आहे.
कळंगुट येथे मंत्री मायकल लोबो पत्रकारांशी बोलत होते. स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या विषयावर तोडगा कशा पद्धतीने काढता येईल, याविषयी आपण सरकारला सांगितले आहे. सरकारने यावर निवडणुकीच्या वेळी उपाय काढण्याचा प्रयत्न करून नये. एखादी व्यक्ती न्यायालयात जाऊन त्यावर अंतरिम स्थगिती आणेल. त्यामुळे हा विषय आताच संपवायला हवा, असेही लोबो म्हणाले.
गोवा माईल्समुळे निर्माण झालेल्या वादाविषयी आपण नेहमीच आवाज उठविला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याविषयी तोडगा काढतील, अशी आपल्याला अपेक्षा आहे. सध्या गोवा माईल्स व स्थानिक टॅक्सीवाल्यांमधील वादाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. अशावेळी आपण प्रेक्षक बनू शकत नाही. त्यावर कारवाईची आवश्यकता आहे. टॅक्सीवाल्यांचा हा विषय वाहतूक खात्याच्या अखत्यारित येतो. पर्यटन खात्याने मागील दाराने यात शिरकाव केला आहे, असा आरोप लोबो यांनी केला. काहीजण छाती बडवून आपण ‘गोवा माईल्स’ गोव्यात आणल्याचे सांगत आहेत. त्यांना स्थानिक टॅक्सीवाल्यांची अडचण समजणार नाही. मी स्थानिक टॅक्सीवाल्यांसोबत आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह संबंधितांशी पत्रव्यवहार केला आहे.
मंत्री मायकल लोबो म्हणतात...
गोवा माईल्स संदर्भात वाहतूक विभागाने अधिसूचना काढली असल्यास ती दाखवावी. हा विषय वाहतूक खात्याशी निगडित असताना पर्यटन खात्याने याबाबतची अधिसूचना कशी काढली ? गोवा माईल्सच्या काऊंटरला परवानगी देत पर्यटन खाते अधिसूचना कशी काढू शकते ? आपण सरकारला दिलेल्या तोडग्याची अंमलबजावणी झाल्यास हा प्रश्न थेट पन्नास टक्के तरी सुटेल.
__
महिला आरक्षणात घोळ झाल्याने पाच नगरपालिकांच्या निवडणुका उच्च न्यायालयाने स्थगित ठेवल्या आहेत. प्रत्येकी एक जागा महिलांसाठी कमी असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यात सुधारणा करावी.
__
आपण सर्व धर्माचा आदर करतो, उत्सवात सहभागी होताे. शिवजयंतीच्या विरोधात आपण नाही. जिल्हाधिकार्‍यांना दिलेले पत्र इतर गोष्टींशी निगडित होते. त्याचा कळंगुटमधील शिवजयंती मिरवणुकीशी संबंध नव्हता. कळंगुटमधील धार्मिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी आपले प्रयत्न सदैव आहेत.