निर्यातीसाठी आधुनिक बोटी बांधणार

मुख्यमंत्री : पर्यटनासाठी एमपीटी व्यावसायिक केंद्र उभारणार


03rd March 2021, 11:34 pm
निर्यातीसाठी आधुनिक बोटी बांधणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
गुंतवणुक कायद्यात दुरुस्ती होणार
पणजी : गोव्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या बोटी तसेच बार्ज यांचे बांधकाम केले जात आहे. बार्ज व बोटींची निर्यातही केली जात आहे. विविध उपक्रम राबवून जहाज बांधणी उद्येगाला साहाय्य करण्याचे सरकारचे धोरण आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी सांगितले. सागरी परिषदेत व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सहभागी होताना त्यांनी ही माहिती दिली.
सागरी शिखर परिषदेचे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बुधवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सागरी उद्योग क्षेत्रातील मूलभूत सुविधांची माहिती दिली. वेर्णा औद्योगिक वसाहतीत देशातील पहिले मेरिटाईम क्लस्टरची स्थापना होणार आहे. या क्लस्टरमध्ये सर्व सुविधा केंद्रे आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुरगाव बंदराचे अध्यक्ष डॉ. रमेशकुमार, उद्योग सचिव जे. अशोक कुमार, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी सादरीकरण केले.
सागरी क्षेत्रातील गुंतवणुकीसह अन्य गुंतवणूकदारांना उद्योग स्थापन करणे शक्य व्हावे यासाठी गुंतवणूक कायद्यात दुरुस्ती केली जाईल. सचिव जे. अशोक कुमार यांनी सादरीकरणात ही माहिती दिली. सरकारी खासगी भागीदारी तत्त्वावर अत्याधुनिक मेरीटाईम विद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. गोवा हे देशातले प्रसिद्ध लॉजिस्टिक हब व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोव्याचे हवामान आणि वातावरण गुंतवणुकीसाठी योग्य आहे.
पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी फेरी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, असे पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी सांगितले. सांता मोनिका जेटीवर नवे क्रुज टर्मिनल होईल, असेही त्यांनी सांगितले.