विजयी पताका फडकवण्यास टीम इंडिया सज्ज

इंग्लंड विरुद्ध आज निर्णायक चौथी कसोटी : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रवेशासाठी भारताचा दावा मजबूत


03rd March 2021, 10:50 pm

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारी (दि.४) सुरुवात होणार आहे. ही कसोटी अहमदाबादच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहे. या कसोटीच्या तयारीसाठी यजमान भारतीय संघाचे खेळाडू कसून मेहनत घेत आहेत. यासाठी नेटमध्ये कसून सराव करण्यात आला. तिसऱ्या कसोटीतील विजयाने टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील प्रवेशाचा दावा मजबूत झाला आहे. आता चौथ्या कसोटीतही विजयी पताका फडकवून फायनल गाठण्यावर टीम इंडियाची नजर आहे.
सध्या इंग्लंड संघाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे. आता चौथ्या कसोटीतील विजयानेच टीम इंडियाला अंतिम फेरीचा पल्ला गाठता येणार आहे. याशिवाय कसोटी ड्रॉ झाल्यासही भारतीय संघाला फायदा होणार आहे.
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी आधी इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणाला, भारताविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णीत करण्यात यशस्वी झालो तरी कर्णधार म्हणून माझे सर्वात मोठे यश असेल. भारतासाठी हा ‍सामना फार महत्त्वाचा आहे. पण इंग्लंडच्या कर्णधाराच्या मनात ही कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटावी अशी इच्छा आहे. इंग्लंडने अंतिम कसोटीत विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलिया टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल.
क्रिकइन्फोशी बोलताना रूट म्हणाला, गेल्या काही वर्षातील भारतीय भूमीवरील विक्रम पाहता ही गोष्टी अविश्वसनीय आहे. त्यामुळे ही मालिका अनिर्णीत करण्यात जरी यश आले तरी एक मोठा विजय असेल. विशेषत: गेल्या दोन सामन्यांत पराभव झाल्यानंतर ही गोष्टी महत्त्वाची ठरेल. गेले दोन आठवडे आमच्यासाठी फार आव्हानात्मक होते. दरम्यान, ही मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहुण्या इंग्लंड संघाचे अनुभवी फलंदाज सपशेल अपयशी ठरले. यातूनच इंग्लंड संघाने आता आपल्या संघासाठी मार्कस ट्रेस्कोथिक यांची फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता मार्कस यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडची आघाडी आणि मधली फळी आपल्या फलंदाजीचा दर्जा उंचावणार आहे. कारण, या मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला सुमार फलंदाजीचा मोठा फटका बसला. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात टीमने ८१ धावांत आपला गाशा गुंडाळला. त्यामुळे संघावर प्रचंड टीकाही झाली. मात्र, या दरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंनी सर्व खापर खेळपट्टीवर फोडले.
लाल मातीवर पुन्हा फिरकीची चमक
यजमान टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक कसोटीसाठी आताही लाल मातीची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. हा सामना स्टेडियमवरील चौथ्या नंबरच्या पिचवर खेळवण्यात येणार आहे. या पिचसाठी खास लाल मातीचा वापर करण्यात आला. ही पिच फिरकीपटूंसाठी फायदेशीर ठरणारी आहे. गत तिसऱ्या कसोटीसाठीही लाल मातीची पिच तयार करण्यात आली होती. यावर चमकदार कामगिरी करताना फिरकीपटूंनी पाच दिवसांचा कसोटी सामना अवघ्या पावणेदोन दिवसांत संपवला होता. या कसोटीत ३० पैकी २८ विकेट या फिरकीपटूंनी घेतल्या होत्या. त्यामुळे ही पिच अधिकच चर्चेत राहिली होती.
विराटने टीकाकारांना सुनावले
चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहली म्हणाला, टीकाकारांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही पाच दिवस कसोटी सामना खेळावा की जिंकण्यासाठी? सामना जिंकणे हे आमचे प्रमुख लक्ष्य आहे आणि सामन्यादरम्यान काय चर्चा होतात त्याकडे आमचे लक्ष नसते. आम्ही देशात-परदेशात यश मिळवले आहेत. आम्ही कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार न करता खेळतो आणि हेच आमच्या यशामागचे कारण आहे.
प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल शक्य
चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आणि ती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता आहे. तिसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला जास्त षटके टाकण्याची संधी मिळाली नाही. त्याच्याजागी कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पटकावू शकतो. कुलदीप, आर. अश्विन आणि अक्षर पटेल या तीन फिरकीपटूंसह संघ मैदानावर उतरणार आहे.
कसोटी मालिका बरोबरीत सुटल्यास कर्णधार म्हणून ते माझे यश असेल. गेल्या काही वर्षांत आम्ही जी प्रगती केली आहे, ती खुप चांगली आहे. विशेषत: परदेशात आम्ही विजय मिळवले आहेत. जर आम्ही चौथा कसोटी सामना जिंकला तर सहा कसोटीतील हा चौथा विजय असेल. _ जो रूट, कर्णधार, इंग्लंड
ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडला पाठिंबा
या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडचा संघ मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानावर उतरली आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्य्रू मॅकडोनाल्ड काय म्हणतात, या सामन्यावर आमचाही फायदा दडलेला आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर आम्हाला इंग्लंडला पाठिंबा द्यावा लागत आहे. आशा करतो की ते त्यांची कामगिरी चोख बजावतील. त्यासाठी इंग्लंडला शुभेच्छा.

२०१२ मध्ये भारताचा अखेरचा मालिका पराभव
इंग्लंडने टीम इंडियाला भारतातच २०१२ मध्ये कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नाही. टीम इंडियाने भारतात २०१९ मध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हा बांगलादेशचा २-० असा एकतर्फी पराभव केला होता. हा भारताचा १२ वा मालिका विजय ठरला होता. टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या देशात खेळताना सलग २ वेळा १०-१० कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.
मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणारे संघ
भारत : १२ मालिका, फेब्रुवारी २०१३ ते आतापर्यंत
ऑस्ट्रेलिया : १० मालिका, नोव्हेंबर १९९४ ते नोव्हेंबर २०००
ऑस्ट्रेलिया : १० मालिका, जुलै २००४ ते नोव्हेंबर २००८
वेस्टइंडिज : ८ मालिका, मार्च १९७६ ते फेब्रुवारी १९९६
इंग्लंड : ७ मालिका, मे २००९ ते मे २०१२
दक्षिण आफ्रिका : ७ मालिका, मार्च १९९८ ते नोव्हेंबर २००१ 
.........
भारताचा संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, उमेश यादव.
इंग्लंडचा संघ : डॉम सिबली, जॅक क्रॉली, जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फॉक्स, डोम बेस, जैक लीच, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन.