वेलिंगच्या समर वॉरियर्स संघाला विजेतेपद


03rd March 2021, 10:49 pm

वाळपई : सत्तरी तालुक्यातील बाराजण खोतोडा येथील सतीदेवी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विद्युतझोतातील अखिल गोवा व्हॉलिबॉल स्पर्धेत समर वॉरियर्स (वेलिंग-प्रियोळ) संघाने विजेतेपद प्राप्त केले आहे. अंतिम फेरीत समर संघाने कुलमाया स्पोर्ट्स क्लब संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक गोवा पोलिस संघाला प्राप्त झाले. विजेत्या समर वॉरियर्स संघाला रोख रुपये ३१ हजार व आकर्षक चषक, उपविजेत्या कुलमाया स्पोर्ट्स क्लबला २१ हजार रुपये व आकर्षक चषक, तर तिसरा क्रमांक पटकावलेल्या गोवा पोलिस संघाला ११ हजार रुपये व चषक देण्यात आले. त्याशिवाय अनेक वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. वितरण समारंभाला खोतोडा पंचायतीचे माजी सरपंच विनायक उर्फ दादा सावईकर, उद्योजक विष्‍ण‍ू दळवी, शाबा गावकर, पांडुरंग माळशेकर क्लबचे अध्यक्ष वासुदेव गावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत एकूण सहा संघांनी भाग घेतला होता यात समर वॉरियर्स, कुलमाया स्पोर्ट्स क्लब, गोवा पोलिस, कार्दोसा ब्रदर्स, सर्वण डिचोली व एनएमएससी कुडका संघाचा यामध्ये समावेश आहे.
याप्रसंगी बोलताना दादा सावईकर म्हणाले, बाराजण येथील युवकांनी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून मुलांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे खरोखरच कौतुकास्पद कार्य केल्याचे प्रतिपादन केले. या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. याप्रसंगी सत्तरी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते उदय सावंत, नगरगाव जिल्हा पंचायत सभासद राजश्री काळे, उद्योजिका आशा देसाई, माजी सरपंच ओमप्रकाश बर्वे, सामाजिक कार्यकर्ते प्रेमनाथ दळवी, खोतोडाचे सरपंच राजेश पर्येकर आदी उपस्थित होते. पारंपरिक समई प्रज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेसाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नागरिकांचा आयोजकांच्यावतीने सन्मान करण्यात आला होता.