वोविनामला शाळा क्रीडा प्रकाराची मान्यता

भारतीय वोविनाम महासंघाचे अध्यक्ष डॉ. सहाय यांचे आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd March 2021, 10:48 pm

म्हापसा : वोविनाम (मार्शल आर्ट) या क्रीडा प्रकाराला शाळा क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळाली आहे. गोवा युवा स्पोर्टस् क्लब व गोवा वोविनाम असोसिएशने हा क्रीडा प्रकार शिकविण्यासाठी विद्यालयांशी संपर्क साधून मुलांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन भारतीय वोविनाम महासंघाचे अध्यक्ष डॉ. विष्णू सहाय यांनी केले.
बस्तोडा येथील बांदेश्वर मंदिराच्या सभागृहात गोवा युवा स्पोर्टस् क्लब-उसकई व गोवा वोविनाम असोसिएशनतर्फे आयोजित अखिल गोवा पातळीवर वोविनाम मार्शल आर्ट फाईट चॅम्पियन्स स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सहाय्य बोलत होते.
या सोहळ्यात निवृत्त शारिरीक शिक्षक शिवा कंकणवाडी यांच्या हस्ते समई प्रज्व‌लित करून दोन्ही संघांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महासंघाचे सहसचिव शंकर महाबले, मास्टर लेस्ली मितेई, उद्योजक अमित नाईक, गोवा वोविनाम संघटनेच्या अध्यक्षा शर्मिला पवार, गोवा युवा स्पोर्टस् क्लबच्या प्रमुख कृतिका गोलतेकर व भाग्यश्री महाबले उपस्थित होत्या.
स्पर्धेतील वेगवेगळ्या गटांत सहा संघातील १५० वोविनामपटूंनी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला. स्पर्धेत ४५ सुवर्णपदकांची कमाई खेळाडूंनी केली. यात ३५ उपकनिष्ठ गटात व कनिष्ठ गटात तर वरिष्ठ गटात १० सुवर्णपदकांचा समावेश आहे. शिवाय खेळाडूंनी ३४ रौप्यपदके प्राप्त केली. त्यात कनिष्ठ गटात २७, तर वरिष्ठ गटातील सात पदकांचा समावेश आहे. तर १८ कांस्यपदकप्राप्त झाली. त्यात १८ कनिष्ठ तर तीन वरिष्ठ गटांत पदक मिळाली.
स्पर्धेत युवा गोवा स्पोर्टस् क्लबच्या संघाने ४५ पैकी २० सुवर्णपदाकांची कमाई करून चॅम्पियनशीपचे विजेतेपद प्राप्त केले. प्रशिक्षक प्रभू मडीवालर यांच्या नेतृत्वाखालील पर्वरीच्या कुओ श्यू कुंगफू संघाने १२ सुवर्णपदक मिळवून उपविजेतेपद मिळविले. तर प्रशिक्षक साईल रेवोडकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा कुंग-फू असोसिएशने ४ सुवर्णपदक मिळवून तृतीय स्थान प्राप्त केले. पदक प्राप्त खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमीर गोलतेकर व सिद्धेश आईर यांनी केले. तर आभार संघाचे अध्यक्ष अक्षय गोवेकर यांनी मानले.
वोविनाम महासंघाच्या सदस्यपदी कृष्णा गोलतेकर
गोव्यात प्रथमच यशस्वीरित्या वोव्हीनाम स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबद्धल स्पोर्टस् क्लबचे संस्थापक कृष्णा गोलतेकर यांची भारतीय महासंघाच्या कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी घोषणा यावेळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. विष्णू सहाय यांनी केली.