पालिका निवडणुकांत आघाडी नको : खासदार फ्रान्सिस सार्दिन

न्यायालयीन निकालामुळे सरकारचे चुकीचे प्रयत्न उघड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd March 2021, 10:43 pm

मडगाव : राज्यात होणाऱ्या पालिका निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत, त्यामुळे पालिका निवडणुकांत कोणत्याही प्रकारची युती केली जाऊ नये, असे आपले मत आहे. पालिका निवडणुकांमध्ये चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्यांना जिंकण्यासाठी प्रयत्न करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे मत दक्षिण गोवा खासदार फान्सिस सार्दिन यांनी व्यक्त केले.
पालिका आरक्षणाबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पालिका निवडणुका राज्य सरकार चुकीच्या पद्धती वापरून जिंकू पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरक्षणातून विरोधकांना बाहेर काढण्याचा भाजपचा प्रयत्न न्यायालयाच्या निकालामुळे फसलेला आहे. मागासवर्गीय समाजाला नेतृत्व करण्यासाठी करण्यात आलेल्या आरक्षणाचा हक्काचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला होता, असे दक्षिण गोवा खासदार फान्सिस सार्दिन यांनी सांगितले.
बंदर व नद्यांवरील हक्क हा स्थानिक प्रशासनाचा असला पाहिजे, त्यामुळे बंदर उभारणीवरून राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांना या प्रकल्पांचा फायदा लक्षात येईल. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे, बांधकामे सुरू असून त्यांना बेकायदेशीररीत्या उपलब्ध होणारी वाळू पुरवली जात आहे. वाळू व्यवसाय अजूनही कायदेशीररीत्या सुरू न झाल्याने लोकांना वाढीव दराने बेकायदा उपलब्ध होणारी वाळू घ्यावी लागत आहे. सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत असल्याने राज्य सरकारने वाळू व्यवसाय परवाने उपलब्ध करून कायदेशीररीत्या सुरू करावा, अशी मागणी फान्सिस सार्दिन यांनी केली आहे.
रेल्वे दुपरीकरणाच्या मुद्द्यावरूनही फान्सिस सार्दिन यांनी लोकांच्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करू नये. लोकांच्या जमिनीचे, घरांचे नुकसान करून प्रकल्प केले जाऊ नये. लोकांच्या मागणीनुसार प्रकल्प उभारणी आवश्यक आहे. लोकांच्या हिताचे नसलेला रेल्वे दुपरीकरणासारखा प्रकल्प पुढे नेला जाऊ नये, असेही सार्दिन म्हणाले.
राज्य सरकार मोठमोठी आश्वासने देत असून ही सर्व आश्वासने पोकळ असल्याचे लोकांना दिसून आल्यानेच आता लोक रस्त्यावर उतरत आहेत. लोकांच्या भल्याचे जे असेल तेच राज्य सरकारने करावे. सीआरझेड, सीझेडएमपी अशा विषयांवरून केंद्राचे म्हणणे ऐकून निर्णय न घेता लोकांचे म्हणणे ऐकून निर्णय घेणे आवश्यक आहे. _फान्सिस सार्दिन, दक्षिण गोवा खासदार