नावेलीसाठी आप उमेदवार डिसिल्वांचा अर्ज दाखल


03rd March 2021, 10:43 pm

पणजी : माटिल्डा डिसिल्वा यांनी बुधवारी नावेली मतदारसंघातील जिल्हा पंचायत पोट निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत बाणावली मतदारसंघातील आपचे जिल्हा पंचायत सदस्य हन्झेल फर्नांडिस आणि नावेली, द्रमापूर, तेलौळी व इतर गावातील गावकरी होते.
माटिल्डा यांनी मूलभूत सुविधा या काळाची गरज असल्याचे सांगून जनतेला चांगल्या आरोग्याची सुविधा देण्याबरोबरच मतदारसंघात कचरा प्रश्नाचे व्यवस्थापन तसेच जनतेला नियमित वीज देण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे सांगितले. एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, आपण गावात बरीच सामाजिक कामे करीत आहाेत आणि म्हणूनच लोकांनी आपल्याला निवडणूक लढविण्यास सांगितले.
यावेळी माटिल्डा डिसिल्वा यांनी नावेली जिल्हा परिषद मतदारसंघाला चांगल्या भविष्यासाठी 'आप'ला मतदान करण्याचे आवाहन केले आणि लोक तसे करतील अशी आशाही व्यक्त केली. आपचे नेते कॅप्टन वेंझी व्हिएगास, हे देखील यावेळी उपस्थित होते.