मांद्रे, म्हापशात उद्यापासून नेमबाजी स्पर्धा

रायफल शूटिंग असोसिएशनतर्फे आयोजन


01st March 2021, 11:40 pm

पणजी : रायफल शूटिंग असोसिएशन, गोवातर्फे दुसरी अखिल गोवा नेमबाजी स्पर्धा येत्या ३ ते ५ मार्च या कालावधीत मांद्रे येथील यश शूटिंग हब व म्हापसा येथील यश शूटिंग अकादमी येथे होणार आहे. स्पर्धा स्मॉल बोअर आणि एअर रायफल-पिस्तूल गटात होईल.
अखिल गोवा नेमबाजी स्पर्धेत गोव्यातील सर्व नेमबाज भाग घेऊ शकतील. या स्पर्धेद्वारे आगामी अखिल भारतीय जी. व्ही. मावळणकर नेमबाजी स्पर्धा आणि पश्चिम विभाग नेमबाजी स्पर्धेसाठी पात्रता मिळविता येईल. रायफल शूटिंग असोसिएशन, गोवा यश शूटिंग अकादमीच्या सहकार्याने स्पर्धा घेणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका एनआरएआयच्या ऑनलाईन पद्धतीनुसार स्वीकारल्या जातील. त्यासाठी www.thenrai.org या संकेतस्थळावर जावे लागेल. प्रवेश शुल्क भरल्यानंतर पुन्हा मिळणार नाही. प्रवेश शुल्क म्हापसा येथील यश शूटिंग अकादमी येथे स्वीकारण्यात येतील, त्यासाठी सोबत स्पर्धकांना ऑनलाईन प्रवेशिकेची प्रत सादर करावी लागेल.
स्पर्धेच्या तारखेपासून २१ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील असलेला नेमबाज अनुक्रमे ज्युनियर, यूथ व सबज्युनियर गटात भाग घेऊ शकेल. प्रवेशिका २८ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील आणि उशिरा २ मार्चपर्यंत तिप्पट शुल्कासह स्वीकारल्या जातील. एअर रायफल-एअर पिस्तूल प्रकारात ५०० रुपये, स्मॉल बोअर रायफल-पिस्तूल प्रकारात १००० रुपये, ३ पोझिशन स्मॉल बोअर रायफल प्रकारात १२०० रुपये प्रवेश शुल्क असेल. रायफल शूटिंग असोसिएशन गोवाचे सदस्य असलेल्या गोव्यातील नेमबाजांना स्पर्धेत भाग घेता येईल. इतर राज्यांतील नेमबाज सहभागी होऊ शकणार नाही. एअर रायफल आणि एअर पिस्तूल प्रकारात कमीत कमी १० वर्षीय, तर फायरआर्म्स प्रकारात कमीत कमी १२ वर्षीय स्पर्धक भाग घेऊ शकेल.