मालपे येथील क्रिकेट स्पर्धेत विर्नोडा बॉईज अजिंक्य


01st March 2021, 11:39 pm

क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : मूळवीर स्पोर्ट्स क्लब, मालपे आयोजित मर्यादित क्रिकेट स्पर्धेत विर्नोडा बॉईजने अजिंक्यपद पटकावले. मालपे मैदानावर सकाळी नऊ वाजता क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. सुरुवातीला या स्पर्धेचे उद्घाटन माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रशांत धारगळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजसेवक मधू परब, डॉ. पेडणेकर, सत्यवान मळेवाडकर, सुनील मालपेकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा सुरुवातीचा सामना मूळवीर बॉईज आणि मूळपुरुष संघ यांच्यात खेळविण्यात आला. अंतिम सामन्याची लढत भुतेश्वर संघ आणि विर्नोडा या दोन संघात झाली. विर्नोडा बॉईजने प्रथम फलंदाजी करताना ७२ धावा काढल्या. यामध्ये संतोष नारूळकर (५४) याने सर्वाधिक धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात खेळताना भुतेश्वर संघ अवघ्या ४२ धावांवर बाद झाला. विर्नोडा बॉईजच्या संतोष नारूळकरने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गोलंदाजीतही ७ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद केले. तर चरणने १० धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले. सामन्यातील मालिकावीर पुरस्कारासाठी संतोष नारूळकर यांची निवड करण्यात आली. सामनावीर पुरस्कार गोलंदाज चरण याला देण्यात आला. तर उत्कृष्ट गोलंदाजीसाठी भूतेश्वर संघाच्या शुभमची निवड करण्यात आली.
स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी राष्ट्रीय कबड्डीपटू प्रशांत धारगळकर यांच्यासह तरुण भारतचे पत्रकार महादेव गवंडी, उद्योजक मधू परब, बाळा सावळ देसाई, प्रकाश कवठणकर, विनोद मालपेकर, सत्यवान मळेवाडकर आदींच्या हस्ते करण्यात आले.