भारताकडून जर्मनीचा ६-१ असा धुव्वा

पुरुष हॉकी संघाचे दिमाखात पुनरागमन


01st March 2021, 11:38 pm

डसेलडॉर्फ : जवळपास १२ महिन्यांनंतर पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत यजमान जर्मनीचा ६-१ असा धुव्वा उडवत जर्मनी हॉकी दौऱ्याची शानदार सुरुवात केली. निळकंठ शर्मा (१३व्या मिनिटाला), विवेक सागर प्रसाद (२७व्या आणि २८व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (४१व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (४२व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग (४७व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयासाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत जर्मनीच्या बचावफळीवर दडपण आणले. सातत्याने चाली रचल्याने भारताला १३व्या मिनिटाला पहिला पेनल्टीकॉर्नर मिळाला, त्यावर निळकंठने गोल केला. मग पुढच्याच मिनिटाला कॉन्टन्टिन स्टेइबने जर्मनीला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
दुसऱ्या सत्रात विवेकने लागोपाठ दोन गोल करत भारताला ३-१ असे आघाडीवर आणले. तिसऱ्या सत्रात जर्मनीने सहा पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण पी.आर. श्रीजेशच्या भक्कम बचावासमोर त्यांना एकही गोल करता आला नाही. मात्र ललित आणि आकाशदीपने गोलची भर घालत भारताची आघाडी ५-१ अशी वाढवली. अखेरीस हरमनप्रीतने गोल करत भारताला चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला.
भारतीय महिला जर्मनीकडून पराभूत
भारतीय महिला हॉकी संघाला जर्मनी दौऱ्यातील दुसऱ्या सामन्यात ०-१ असा पराभवाचा सामना करावा लागला. भारताने पहिला सामना ०-५ अशा फरकाने गमावला होता. अमेली वॉर्टमन हिने २४व्या मिनिटाला केलेला गोल यजमानांच्या विजयात निर्णायक ठरला. या विजयासह जर्मनीने चार सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.