काँग्रेसमध्ये धुसफूस की फूट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकणारा नेता पक्षाध्यक्षपदी असावा, सर्व पातळ्यांवर संघटनात्मक बांधणी केली जावी, अशी मागणी करणारे नेते काँग्रेसला परके वाटू लागले आहेत.

Story: अग्रलेख |
01st March 2021, 12:44 am
काँग्रेसमध्ये धुसफूस की फूट?

‘आम्ही काँग्रेसला अधिक मजबूत करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे, आमच्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, कारण आम्ही सातत्याने काम करीत आजच्या स्थानी पोचलो आहोत, आकाशातून अचानक पडलेलो नाही’ अशा आक्रमक शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी काश्मीरमधील बैठकीत केलेले निवेदन नेमके कोणाला उद्देशून आहे, हे वेगळे सांगावे लागत नाही. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाला योग्य दिशा देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी गेल्या वर्षी केल्यानंतरही त्या पक्षात कोणतेही बदल करण्यात आलेले नसल्याने ‘जी-२३’ नावाने ओळखल्या जाणाऱ््या गटाने काश्मीरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुलाब नबी आझाद, कपिल सिब्बल, भूपिंदर सिंग हुडा, मनीष तिवारी, राज बब्बर आदी नेत्यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. हा आवाज संबंधितांपर्यंत जाईल याची खात्री देता येत नाही. हे सर्व नेते भाजपला अनुकूल असे वर्तन करीत आहेत, अशी टीका त्यांच्यावर यापूर्वी राहुल गांधी यांनी केली होती. त्यामुळे पक्षावरील पकड सोडण्यास गांधी कुटुंब तयार नसल्याचेच दिसते आहे. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते सुधीर रंजन चौधरी यांनी तर गांधी नसताना पक्षाची कशी वाताहात होत होती, त्याचा पाढा वाचला आहे. सीताराम केसरी आणि पी.व्ही.नरसिंह राव पक्षाध्यक्षपदी असताना १९९० पासून काँग्रेसची घसरण होत राहिली आणि नंतर सोनिया गांधी अध्यक्षपदी आल्यावर काँग्रेस सावरली आणि यूपीए आघाडी आली, असे त्यांचे म्हणणे आहे. इतिहासापासून धडा घेण्यात गैर काहीच नाही, मात्र आजची स्थिती काय आहे, त्याकडे मात्र असे नेते कानाडोळा करून देशाला ‘काँग्रेसमुक्त‘ करण्याच्या भाजपच्या मोहीमेला हातभार लावत आहेत. सोनिया गांधी आजारी असून, त्या नाईलाजाने पक्षाचे सर्वोच्च पद सांभाळत अाहेत, तर राहुल गांधी यांनी हे पद सोडून आधीच जबाबदारी नाकारली आहे. हे सारे लक्षात न घेता इतिहासाचे दाखले देत काही नेते आजही पक्षाध्यक्षपदी गांधीच पाहिजेत अशी मते व्यक्त करीत आहेत.
गुलाब नबी आझाद अथवा कपिल सिब्बल यांनी पक्षाला दिलेले योगदान अमूल्य आहे. अन्य काही नेते जे आज ज्येष्ठ मानले जातात, ते कोणत्या तरी चळवळीतून, आंदोलनातून, जनमानसात स्थान मिळवून वर आले आहेत. त्यांना दुर्लक्षून अथवा त्यांची उपेक्षा करून सोनिया अथवा राहुल गांधी काँग्रेसला अधोगतीकडे तर नेत नाही ना, अशी शंका देशातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांना येत आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल ज्येष्ठ नेत्यांच्या मनात आकस आहे, असे मानण्याचे कारण नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाबसारख्या राज्यांत तर काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्यात स्थानिक नेत्यांचे भरीव योगदान आणि त्यांचे नेतृत्व कारणीभूत आहे. केंद्रीय पातळीवरील नेतृत्व सबळ नसेल तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय या आधीच आला आहे. गोव्यापासून सुरू झालेली काँग्रेसची घसरण नंतर मध्य प्रदेश आणि आता पुदुचेरीपर्यंत येऊन ठेपली आहे. या राज्यांतील सत्ता केवळ दुर्बळ नेतृत्वामुळे गमवावी लागली, नंतर बिहारसारख्या राज्यातही दारूण पराभव पत्करावा लागला. आता तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पुदुचेरी येथील निवडणुकांना हा पक्ष कसा सामोरे जाईल, त्याची काय पूर्वतयारी सुरू आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किमान केरळ आणि आसाममध्ये तरी अपेक्षित यश काँग्रेसला मिळेल की नाही, ही शंकाच आहे. अशा स्थितीत ज्येष्ठ नेत्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत सध्याचे नेतृत्व आपलाच खड्डा तर खोदत नाही ना, असा संशय घेण्यासारखी आज स्थिती आहे.
पक्षवाढीसाठी पैसे, मनुष्यबळ आणि प्रसारमाध्यमांचा आधार लागतो. यापैकी विद्यमान नेतृत्व काँग्रेसला काय देऊ शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकणारा नेता पक्षाध्यक्षपदी असावा, सर्व पातळ्यांवर संघटनात्मक बांधणी केली जावी, अशी मागणी करणारे नेते पक्षाला परके वाटू लागले आहेत. खरे पाहाता नेत्यांचे हे बंड नसून त्यांना पक्षाबद्दल वाटणारी चिंता त्यांच्या पत्रातून आणि नंतर बैठकांतून व्यक्त होत आहे. सलमान खुर्शीद यांच्यासारखे नेते तर पक्षाने ध्येयधोरणांना तिलांजली दिल्याची खंत व्यक्त करीत आहेत. कपिल सिब्बल यांना पक्ष मजबुत करायचा आहे. आझाद यांचे कार्य दुर्लक्षित करून त्यांना राज्यसभेत पुन्हा आणण्यासाठी पक्षाने काहीही प्रयत्न केलेले नाहीत. अशा प्रकारे नेत्यांना दुखावले गेल्यास त्यांची पावले अन्य पक्षांकडे वळली तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या भवितव्यासाठी हे नेते दुसऱ््या पक्षाकडे गेले तर त्यांना कसे अडविणार? भाजपमधील उपेक्षित नेते अशा वेळी कदाचित गप्प बसतील, मात्र महत्त्वाकांक्षी काँग्रेस नेते अन्यत्र गेले तर त्यात त्यांची काय चूक म्हणता येईल. हे टाळणे अथवा पक्षात फूट पडू देणे यापैकी सोनिया गांधी आणि त्यांचे पाठीराखे काय निवडतात यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.