बंड कसे शमविणार ?

पणजी, ताळगाव, सांताक्रुझ आदी मतदारसंघांत बाबुश यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले असल्याने त्यांची मर्जी सांभाळणे भाजपला भाग पडत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

Story: अग्रलेख |
27th February 2021, 12:00 am
बंड कसे शमविणार ?

पणजी महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात यांनी जाहीर केलेली उमेदवारांची यादी भाजपची नसून, ती चर्चा होऊन कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असे उघडपणे सांगून भाजप प्रवक्ता दत्तप्रसाद नाईक यांनी गुरूवारी बॉम्बगोळाच टाकला. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना जरी हे अनपेक्षित असले तरी यादी जाहीर झाल्यापासून धुमसत असलेली अस्वस्थता कधीतरी प्रकट होईल, असेच सर्वांना वाटत होते. भाजपमध्ये अशा प्रकारे मतभेद जाहीर करण्याची पद्धत नाही किंवा अशी कृती सहन केली जात नाही, याची जाणीव कदाचित आता अस्वस्थ नेत्यांना करून दिली जाईल. पण त्याच बरोबर अशा पद्धतीने यादी जाहीर केली जात नाही, हा असंतुष्टांचा दावा कसा खोडून काढला जातो, याकडे आता अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. संसद असो, विधानसभा असो किंवा पालिका अथवा पंचायत, पक्षाचे उमेदवार ठरवताना चर्चाविनिमय केला जातो. खालच्या स्तरावरील लोकांना त्यात सहभागी करून उमेदवारांची शिफारस केली जाते आणि अखेर वरिष्ठांकडून त्यावर शिक्कामोर्तब केले जाते. अर्थात काही वेळा उमेदवार ठरलेला असतो, तरीही याच पद्धतीने तो अधिकृतपणे जाहीर केला जातो. यापैकी भाजप आमदार बाबुश मोन्सेरात यांनी काहीही न करता, पॅनल जाहीर केले. असंतुष्टांचा दावा कसा चुकीचा आहे, याचे स्पष्टीकरण आता पक्ष देणार आहे का, याची प्रतीक्षा जनतेला आहे.
बाबुश मोन्सेरात यांनी पॅनल जाहीर करताना पक्षनेत्यांना विश्वासात घेतले होते का, त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करताना त्यात निष्ठावंतांची मते विचारात घेतली होती का, याबद्दलची माहिती जनतेसाठी उघड व्हायला हवी. बाबुश मोन्सेरात यांना उमेदवार ठरविण्याचा अधिकार जर पक्षनेत्यांनी दिला होता, तर मग बंडोबांना थंड बसण्यावाचून पर्याय नाही. ताळगावचे भाजप नेते आणि पक्षाचे प्रवक्ते अशी दत्तप्रसाद नाईक यांची जनमानसात प्रतिमा आहे. बाबुश विरोधी पक्षात असताना भाजपच्यावतीने ज्यांनी त्यांच्याशी टक्कर दिली त्यात नाईक यांचा समावेश होतो. त्यांच्या पत्नी शीतल नाईक या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे नाईक यांनी उठविलेला आवाज निश्चितपणे पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे आणि संघटनमंत्री सतीश धोंड यांच्यापर्यंत पोचला असेल. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनीही उमेदवारांच्या निवडीबद्दल असमाधान व्यक्त केले असून माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळकर यांचीही अस्वस्थता प्रकट झाली आहे. त्यामुळे निष्ठावंत विरूद्ध अन्य पक्षातून आलेले नेते व कार्यकर्ते यांच्यातील हा संघर्ष आहे, असे स्पष्टपणे जाणवत आहे. यावर आता भाजप कोणता मध्यम मार्ग निवडते हे आता पाहावे लागेल. मोन्सेरात यांनी यादी जाहीर केल्यानंतर काही नेत्यांना यात बदल हवा आहे, असे सूचित केले होते. त्यामुळे यादीत काही नवी नावे समाविष्ट करून हे बंड म्हणजे पेल्यातील वादळ असल्याचे भासवले जाईल. स्थानिक नेते अशा खेळी खेळण्यात निष्णात आहेत, त्यामुळे या वादाचा वणवा होतो की ते जिथल्या तिथे बुझून जाते हे पाहावे लागेल. बाबुश यांनी यापूर्वी काही पक्षांना रामराम केला आहे, ते भाजपच्या कथित शिस्तीत कसे काय काम करू शकतील अशी रास्त शंका येते. त्यांनी पणजी, ताळगाव, सांताक्रुझ आदी मतदारसंघांत आपले वर्चस्व प्रस्थापित केले असल्याने त्यांची मर्जी सांभाळणे भाजपला भाग पडत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जर काही कार्यकर्ते विरोधी पॅनलमध्ये गेले तर ते पक्षाला हानिकारक ठरू शकतात, याची जाणीव भाजपला नाही असे कसे म्हणता येईल?
भाजपची देश पातळीवर बदललेली भूमिका आणि कार्यपद्धत पाहाता, बाबुश मोन्सेरात यांनी अनुसरलेली पद्धत चुकीची म्हणता येणार नाही. मतांचे गणित पाहून जिंकण्याची शक्यता असलेल्यांना प्रवेश देऊन त्यांना प्रवेश देत उमेदवारी दिली जाते, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच एका मुलाखतीत म्हटले आहे. बाबुश आणि त्यांच्या सहकाऱ््यांना भाजपमध्ये प्रवेश देताना हाच निकष लावण्यात आला होता. ज्यांना आमची ध्येयधोरणे मान्य आहेत, त्यांना आपली मूळ मानसिकता बदलून आमच्याकडे यावे लागेल, असे शहा यांनी बजावले आहे. अलीकडच्या राजकारणात तत्त्वे आणि धोरणे यांना काहीही किंमत राहिलेली नाही. सत्ता हेच उद्दिष्ट असे राजकारणात असलेला प्रत्येक पक्ष मानतो, त्यामुळे गोवा याला कसा काय अपवाद ठरू शकणार? त्याच दिशेने गोव्यातही भाजपची वाटचाल सुरू आहे आणि त्याचा प्रत्यय राजधानी पणजीत येत आहे.