Goan Varta News Ad

मनपातील भाजप पॅनलला पक्षातील काहींचा आक्षेप

आमदार बाबूश यांची खंत; एखादा उमेदवार वगळण्याची शक्यता

|
24th February 2021, 12:07 Hrs
मनपातील भाजप पॅनलला पक्षातील काहींचा आक्षेप

फोटो : बाबूश मॉन्सेरात
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पणजीचे भाजप आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पॅनलला पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे त्यांच्या पॅनलमधील एक किंवा दोन उमेदवार अंतिम क्षणी निवडणुकीतून वगळले जाण्याची शक्यता आहे.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना आमदार बाबूश मॉन्सेरात यांनीही आपल्या पॅनलला पक्षातील काही नेते हरकत घेत असल्याचे स्पष्ट केले. आपण जाहीर केलेल्या पॅनलला बाहेरील कोणाचाही विरोध नाही; पण पक्षातील काहीजणांकडून आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे एखाद्या प्रभागातील उमेदवारात बदल होऊ शकतो. संबंधित प्रभागातील उमेदवार आपल्या पॅनलमधून निवडणूक लढवू इच्छित नाही. त्याला आपण काहीही करू शकत नाही, असे आमदार बाबूश म्हणाले. पक्षातील जे नेते आपण दिलेल्या पॅनलला आक्षेप घेत आहेत, ते आपल्यासमोर किंवा पक्षाकडे जाऊन काहीही बोलत नाहीत. पण त्यांच्याकडून अंतर्गत विरोध सुरूच आहे. नेतृत्व करणाऱ्या लीडरसमोर नेहमीच आव्हाने असतात. आपल्यासमोरही तशी आहेत. आपण जाहीर केलेले पॅनल जनतेसमोर जाऊन मते मागेल. जनतेला त्यांनी केलेली कामे माहीत आहेत. त्याचा विचार करूनच जनता त्यांना मते देईल, असेही त्यांनी नमूद केले.
पॅनलला आक्षेप कशासाठी?
- पणजी महानगरपालिका निवडणुकीत याआधी बाबूश पॅनल विरुद्ध भाजप पॅनल अशीच निवडणूक होत होती.
- माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत झालेली पोटनिवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून आमदार झालेले बाबूश मॉन्सेरात लगेचच भाजपात दाखल झाले. पण भाजपातील काही नेत्यांना बाबूश यांचा भाजप प्रवेश अद्याप रूचलेला नाही.
- पणजी मनपातील प्रभाग फेररचना व आरक्षणामुळे भाजपच्या काही नगरसेवकांचे पत्ते कट झाले. याला पूर्णपणे बाबूश मॉन्सेरात जबाबदार असून, ते भाजपला संपवत असल्याची भावनाही भाजपच्या काही नेत्यांची झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आता बाबूश यांच्या पॅनललाही आक्षेप घेतला जात आहे.