करोनाचा नवा धोका

सरकार जर कार्निव्हल आणि शिमगोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास तयार असेल तर सामान्य भाविकांना सण साजरे करण्यापासून का रोखायचे असा प्रश्न निर्माण होतो.

Story: अग्रलेख |
22nd February 2021, 12:42 am
करोनाचा नवा धोका

महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये नव्याने करोना बाधितांची संख्या वाढल्याने फेब्रुवारीच्या मध्यास हे संकट अधिक गडद बनले आहे. शनिवारी देशात करोनामुळे झालेले मृत्यू शंभर होते, त्यात केरळ १५ आणि पंजाबमध्ये ८ अशी संख्या असली तरी आपले शेजारी राज्य असलेल्या महाराष्ट्रात एका दिवसात ४४ जणांना कोविड-१९ मुळे प्राण गमवावे लागावेत, ही बाब धक्कादायक आहे. त्या राज्यात यवतमाळ, अमरावती आणि सातारा जिल्ह्यांत करोनाने पुन्हा आपले हातपाय पसरायला सुरुवात केल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे. सुदैवाने हा करोना परदेशात प्रादुर्भाव झालेल्या नव्या प्रकारांतील नाही, हे शनिवारी स्पष्ट झाले. काही निर्बंध लादून महाराष्ट्र सरकार या महामारीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असले तरी जनतेच्या सहकार्याशिवाय हा लढा पूर्णत्वास जाणार नाही. गोव्यात करोना नियंत्रणात असला तरी तो पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही, याची जाणीव प्रत्येक गोमंतकीयास ठेवावी लागेल. मृत्यूचे प्रमाण आणि बाधितांची संख्या कमी असली तरी करोना राज्यातून हद्दपार होईपर्यंत सरकारला खबरदारीचे उपाय योजावे लागतील. राज्यातील चित्र पाहाता, करोनापासून मुक्ती मिळायला आणखी अनेक दिवस जातील अशी चिन्हे दिसतात. राज्यातील ग्रामीण भागात तेथील रहिवासी कमी संख्येने मास्क वापरतात किंवा सामाजिक अंतर ठेवत नाहीत, असे दिसून येते. अनेक भागांत क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात, तेथे गर्दी जमते. महत्त्वाचे म्हणजे अशा स्पर्धा भरविण्यात राजकारण्यांचे आर्थिक पाठबळ लाभत असते. निवडणुका जवळ आल्याने नेतेमंडळींनी हात सैल सोडले आहेत. मात्र करोनाचे नियम न पाळता होणारे हे सामने किती धोकादायक ठरू शकतात, याची कल्पना त्लोकप्रतिनिधींना नाही असे कसे म्हणणार? शहरी आणि किनारी भागांत दिसणारे बहुतेक पर्यटक कोणतेही नियम न पाळता मजा लुटताना दिसतात. मार्केट परिसरात दिसणारे किती जण मास्क वापरतात? कागदोपत्री नियम असले, नियमभंगासाठी दंडाची तरतूद असली तरी त्याची अंमलबजावणी कोण आणि कधी करतो हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. राजधानी पणजीत सर्रासपणे पर्यटक कोणत्याही नियमांचे पालन करीत नाहीत. अतिथी देवो भव ही आपली वृत्ती आदर्शवत असली तरी नियमांचे पालन करण्यावर भर देणारी यंत्रणा कुठे आहे?
अनेक ठिकाणी धार्मिक सणांना, उत्सवांना कात्री लावण्यात भाविकांनीच पुढाकार घेतला आहे, तर परंपरा पाळण्यावर भर देणारे पदाधिकारी उत्साहाने सण साजरा करण्यावर भर देत आहेत. मर्यादित स्वरुपात, कमी उपस्थितीत असे सण साजरे करता येऊ शकतात, हे खरे असले तरी यंदाचे वर्ष कोणताही कार्यक्रम हा खबरदारी घेऊन करणे अथवा रद्द करण्यातच शहाणपणा आहे. सरकार जर कार्निव्हल आणि शिमगोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास तयार असेल तर सामान्य भाविकांना का रोखायचे असा प्रश्न निर्माण होतो. अलीकडे एसओपी नावाने नियमावली लागू केली जाते आणि सण, उत्सव, लग्न सोहळे, स्पर्धा, सामने, मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे केले जातात. या नियमावलीचा भंग केलेल्यांना आतापर्यंत दंड झाल्याचे ऐकीवात नाही. कारण हे नियम कागदोपत्रीच राहातात हे जसे खरे तसे त्यावर नजर ठेवायला पुरेशी यंत्रणा नाही, ही वस्तुस्थिती आहे.
देशाने गेले वर्षभर करोना महामारीचा यशस्वी सामना केला असला तरी, अद्याप कोविड-१९ चा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. उलट याच कालावधीत गेल्या वर्षी जी स्थिती होती, तीच नव्याने तयार होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. डिसेंबर २०१९ च्या अखेरीस कोविडचा प्रादुर्भाव होत असल्याची जाणीव जगाला झाली होती. तर २०२० हे वर्ष पूर्णपणे त्या महामारीशी सामना करण्यात खर्ची पडले. जगात लाखो लोकांचे बळी करोनाने घेतले. आपला देशही या संकटातून सुटला नाही, मात्र योग्य वेळी कडक पावले उचलून, निर्बंध लादून केंद्र आणि राज्य सरकारांनी करोनाशी दोन हात केले आणि ही महामारी नियंत्रणात ठेवली असे म्हणता येईल. बाधितांची संख्या, चाचणीचा आकडा, करोनातून बरे झालेल्यांची संख्या ही आकडेवारी पाहिली की, देशाने एका महासंकटाला दिलेली टक्कर उल्लेखनीय मानावी लागेल. करोनाची बाधा होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने त्यावेळी जबाबदारी मानून खबरदारी घेतली. भारतातील संशोधकांनी लावलेला लसीचा शोध आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांत झालेले एक कोटींचे लसीकरण हा याच लढ्याचा पुढचा भाग होता. प्राधान्यक्रमाने डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांचे झालेले लसीकरण आणि त्यानंतर अलीकडे पार पडलेला लसीकरणाचा दुसरा टप्पा यामुळे हे सारे योद्धे सुरक्षित बनून नव्याने जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने कामास लागल्याचे चित्र दिसते आहे. आता ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना लस देण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. अशा पद्धतीने करोनाविरूद्ध छेडलेले युद्ध हे लसीकरणाद्वारे प्रतिबंध या पद्धतीने पुढे जात असताना, दुसरीकडे करोनाने पुन्हा आपला इंगा दाखवायला सुरू केला तर त्याविरूद्ध नव्याने पावले उचलावी लागणार आहेत. प्रतिबंधात्मक उपाय हाच सध्या एकमेव मार्ग असून आरोग्य यंत्रणेवर नव्याने कोणताही ताण येऊ नये यासाठी प्रत्येकाला जबाबदारीने वागावे लागेल.