Goan Varta News Ad

कामगार पुढारी जेराल्ड परेरा

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
31st January 2021, 05:37 Hrs
कामगार पुढारी जेराल्ड परेरा

जेराल्ड परेरा हे कामगार संघटनेचे पुढारी, स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १९२९ रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एमए, एलएलबीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. वास्कोतील सेंट जोसफ शाळेतील दत्तात्रेय देशपांडे यांच्या प्रभावाखाली येऊन ते स्वातंत्र्यसंग्रामात शिरले. देशपांडे यांनी तिरंगा फडकावला आणि पत्रके वाटली. त्यांना अटक झाली. जेराल्ड यांनी तेथून पलायन केले. या आंदोलनात त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले. 

मुंबईला जाऊन त्यांनी नंतर आयसीएससी परीक्षा, कायद्याची पदवी घेतली. तेथे त्यांनी मुक्तीलढा व स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. नंतर ते कम्युनिस्ट चळवळीत शिरले. तेथे त्यांचे गुरू एस. एम. डांगे, जी. अधिकारी, बी. टी. रणदिवे होते. अनेक कामगार चळवळीत परेरा यांनी भाग घेतला. याच काळात त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील एक कार्यकर्ती डाॅ. लुईजा कार्व्हालो लग्न झाले. 

परेरा गोवन्स पीपल्स पार्टीचे सदस्य व गोवन एक या मासिकाचे संपादक होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा, गोवा मुक्तीलढा यावर इंग्रजी व कोकणीत अनेक लेख लिहिले. हस्तलिखित पत्रके छापून ती वाटली. गोवन क्वेश्चन रिकन्सिडर्ड हे त्यातले एक गाजलेले हस्तलिखित. डाॅ. टी. बी. कुन्हांच्या लिखाणाच्या संग्रहाचे ते मुख्य संपादक होते. गोवा मुक्तीनंतर ते गोव्यात आले. १२ जानेवारी १९६२ रोजी त्यांनी मुरगाव धक्क्यावर पहिला संप घडवून आणला. त्यांना चीनधार्जिणा असल्याचा आरोप ठेवून अटक करण्यात आली. १९६४-१९६५ चा ऐतिहासिक गोदी कामगारांचा संप त्यांनी आयोजित केला होता. तेव्हाही त्यांना अटक करून डिचोली तुरुंगात ठेवले. 

परेरा यांनी कामगार एकजूट, कम्युनिस्ट चळवळ यावर रोमी कोकणीत लिहिल आहे. त्यांनी आऊटलाईन आॅफ प्रो पोर्तुगीज हिस्टरी आॅफ गोवा हा प्रबंध लिहिला. त्याला डॉ. दामोदर डी. कोसंबी यांनी मार्गदर्शन केले होते. या पुस्तकात पोर्तुगीजांआधी येथे कोण राज्य करत होते, त्याची लहानसहान माहिती मिळते. त्यात १५१० सालचा गोव्याचा नकाशाही आहे. त्यात तालुके किती होते, त्यांची नावे वाचायला मिळतात. 

भारतीय कामगारांचे सदस्य म्हणून परेरा यांनी रशियाला भेट दिली. त्यांनी सीटू ही संघटनाही स्थापन केली. १९७३-१९७४ त्यांनी कोकाकोला कामगारांचा ऐतिहासिक संप घडवून आणला. २ जून १९७५ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मुंबईत इस्पितळातून त्यांनी आणीबाणीविरुद्धच्या चळवळीत भाग घेतला. २२ फेब्रुवारी १९७६ रोजी ते गोव्यात परतले व पुन्हा कामगार चळवळ सुरू केली. पण, ४ मार्च १९७६ रोजी दुसरा हार्टअॅटक येऊन त्यांचे वयाच्या ४७ वर्षी निधन झाले.