Goan Varta News Ad

शब्द नव्हे शस्त्र

कॅलिडोस्कोप

Story: मनोहर जोशी |
31st January 2021, 05:36 Hrs
शब्द नव्हे शस्त्र

एका गावात एक मुलगा रहात असे. मुलगा स्वभावाने वाईट नव्हता. पण, त्याच्यात एक दोष होता. तो कमालीचा शीघ्रकोपी होता. जरा काही मनाविरुद्ध झाले की तो प्रचंड संतापे आणि रागाच्या भरात काहीही बोले. त्याच्या या स्वभावामुळे त्याचे सर्व मित्र दुरावले. त्याला कोणीही जवळ करेना. त्याच्या या रागीट स्वभावामुळे घरातही त्याच्याशी कोणी नीट बोलत नसे. यामुळे त्या मुलाची चिडचिड वाढली. मुलाच्या वडिलांनी त्याला अनेक वेळा समजावून सांगितले. पण, उपयोग झाला नाही. याचा रागीट स्वभाव कसा कमी करावा, याचा वडील विचार करत होते. त्यांना एक युक्ती सुचली.

त्यांनी पिशवीभर खिळे आणि हातोडी आणली. मुलाला सांगितले की त्याला जेव्हा राग येईल त्यावेळी या पिशवीतला एक खिळा काढायचा आणि घरासमोर जे कुंपण आहे त्यात नेऊन तो ठोकायचा. वडिलांचा विचार असा की खिळा ठोकत असताना त्याचा राग तो त्या खिळ्यावर काढेल आणि रागाची उर्मी कमी होऊन त्याचा राग शांत होईल. मुलाने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे वागायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्याने तब्बल सदतीस खिळे कुंपणात मारले. हाच क्रम चालू होता आणि हळूहळू खिळ्यांची संख्या आणि रागाचा पारा कमी होऊ लागला. एक दिवस असा आला की त्या मुलाने एकही खिळा मारला नाही. याचाच अर्थ असा की त्याचा राग नियंत्रणात येऊ लागला होता. मुलालाही त्याच्या स्वभावातील या बदलाचे आश्चर्य वाटले. थोडा संयम बाळगला तर आपल्याला राग आवरता येतो याची त्याला जाणीव झाली. त्याने वडिलांना जाऊन सांगितले. ते अनुभवी होते. त्याचा हा राग तात्पुरता निवळला आहे. त्याच्या स्वभावात कायमचा बदल व्हायचा असेल तर आणखी काही काळ जावा लागेल, याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी मुलाला जवळ बोलावले, शाबासकी दिली आणि सांगितले की आता तू हे जे खिळे मारले आहेस त्यातला रोज एक खिळा काढायचा आणि पिशवीत टाकायचा. सगळे संपले की मला सांग. रोज एकच खिळा काढायचा असल्याने सगळे खिळे काढायला त्याला बरेच दिवस लागले आणि त्याचा रागीट स्वभाव कायमचा जाऊन तो शांत झाला.

सगळे खिळे काढून झाल्यावर तो वडिलांकडे गेला आणि त्याने खिळे काढल्याचे सांगितले. वडिलांनी त्याच्या पाठीवर थोपटून शाबासकी दिली आणि ते त्याला कुंपणाकडे घेऊन गेले. कुंपणाकडे बोट दाखवून ते त्याला म्हणाले, ‘हे बघ. पहिल्यांदा तू खिळे मारलेस. नंतर ते काढलेस. तुझे काम झाले, पण तू मारलेल्या खिळ्यांनी या कुंपणाला भोकं पडली ती तशीच राहिली. खिळे काढल्यानंतर ती भरून आली नाहीत. माणसाचे असेच आहे. रागाच्या भरात आपण एखादा शब्द बोलून जातो, पण तो एखाद्याच्या जिव्हारी लागतो. बोलणारा माणूस विसरून जातो. ऐकणाऱ्याच्या मनात मात्र तो कायम राहतो. या कुंपणाला पडलेल्या भोकांसारखा. शस्त्राने झालेली जखम भरून येते पण शब्दांनी केलेली जखम भरून येत नाही. म्हणून कितीही राग आला तरी संयम बाळगावा. कारण कधी कधी नकळत झालेले नुकसानसुद्धा भरून काढता येत नाही.’

माणसाच्या अधोगतीला काम, क्रोधादी षड्रिपू कारणीभूत होतात. क्रोध हा माणसाचा दुसरा शत्रू. काही लोक शीघ्रकोपी असतात. अशावेळी त्यांचे स्वतःवरचे नियंत्रण सुटते आणि ते काहीही बोलून जातात. आपण काय बोलतो हे त्यांचे त्यांनाही कळत नसते. आपल्या बोलण्याचा ऐकणाऱ्याच्या मनावर काय परिणाम होईल, याची त्याला जाणीव नसते. पण, ऐकणाऱ्याच्या मनावर मात्र ते शब्द खोल जखमा करून जातात. कदाचित राग निवळल्यावर त्या माणसाने माफी मागितली, आपण चुकलो म्हणाला तरी जखमेवरची खपली तशीच राहते. एखादे वेळी वर्मावर घाव बसला तर संबंध कायमचे तुटतात. काही वेळा सूड घेण्याची भावनाही निर्माण होते आणि नको ते घडते. म्हणून क्रोधावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

क्रोधातून विनाश कसा होतो ते भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या ६३ व्या श्लोकात सांगितले आहे.

‘क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रमः। स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।’

रागाच्या भरात एखादा माणूस काही बोलून गेला तर ते क्षम्य नसले तरी समजण्यासारखे असते. पण, बऱ्याच लोकांना आपण काय, कुठे, कसे, किती बोलावे याचे भान नसते. एखाद्या आजारी माणसाच्या समाचाराला आपण गेलो तर सामान्यतः त्या माणसाचे मनोबल वाढेल, अशा प्रकारे सकारात्मक बोलावे असे अपेक्षित असते. अनेकांना याची जाणीव नसते. या प्रकारच्या आजारात कोण, केव्हा कसा मेला याचं वर्णन ते त्याच्यासमोरच करतात. आजाराने निराश झालेला माणूस अधिकच खचून जातो. नवीन लग्न होऊन आलेल्या मुलीच्या वागण्यात एखादी चूक होते. तसं पाहता ती चूक नसते. माहेरच्या सवयीनुसार ती वागते. अशा वेळी योग्य शब्दात तिला जाणीव करून न देता लगेच ‘तुझ्या घरच्यांनी हेच शिकवले का तुला?’ असं म्हणून तिचं माहेर वर काढलं जातं. कोणत्याही स्त्रीला एकवेळ तिला बोललं तर चालतं, पण तिच्या माहेरच्यांना दोष दिला तर तिच्या मनाला फार लागतं. यातून नात्यात एक प्रकारची अढी कायमची निर्माण होते.

काही पालकांना मुलांना टोचून बोलण्याची सवय असते. परीक्षेत मार्क कमी पडले की, ‘सामको बोणो मरे तू’ किंवा एखादे काम जमले नाही तर, ‘एवढा मोठा घोडा झालास अजून कळत नाही’ वगैरे. चारचौघांत असे बोलले तर तो मुलगा अपमानित होतो. हे सतत घडत राहिले तर परिणामी वडिलांविषयी तिरस्कार निर्माण होतो. म्हणून शब्द जपून वापरावे. बोलण्यापूर्वी आपण काय बोलणार आहोत, याचा क्षणभर विचार करावा.

शब्द हे शस्त्रासारखे असतात. शब्दाने माणूस जोडला जातो तसाच तो तुटतोही. म्हणून शब्द जपून वापरावेत.

(लेखक साहित्यिक आहेत.)