Goan Varta News Ad

आगलाव्या 'दीप'?

स्पॉटलाइट

Story: राहूल गोखले |
31st January 2021, 05:34 Hrs
आगलाव्या 'दीप'?

दीप सिद्धू हा काही रूढ अर्थाने राजकीय नेता नाही किंवा शेतकरी संघटनेचा पदाधिकारी नाही. मात्र, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला जे हिंसक वळण लागले त्याचे खापर या दीप सिद्धूवरदेखील फोडण्यात येत आहे. सिद्धूनेच प्रक्षोभक भाषणे केली आणि या हिंसक कारवायांना चिथावणी दिली असेही आरोप होत आहेत. स्वतः सिद्धूने या आरोपांचे खंडन केले असले तरीही सिद्धू या सर्व प्रकरणाने चर्चेत आला आहे हे निश्चित. अर्थात त्याला आताच प्रसिद्धी मिळाली आहे, असे नाही. किंबहुना त्याने आपल्याला लाभलेल्या प्रसिद्धीच्या जीवावरच शेतकरी आंदोलनात भाग घेतला आणि समर्थक मिळविले असे म्हणणे अधिक संयुक्तिक होईल.

छत्तीस वर्षीय दीप सिद्धूने वेगवेगळ्या भूमिका आयुष्यात आणि पडद्यावर वठविल्या आहेत. तो पूर्वी मॉडेलिंग करायचा, कॉर्पोरेट वकील होता आणि पंजाबी चित्रपटांत देखील तो झळकला. पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील असणारा सिद्धू प्रसिद्धीच्या झोतात खऱ्या अर्थाने आला तो २०१७ मध्ये आलेल्या जोरा दस नंबरीया या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे. विचित्र योगायोग असा की त्या चित्रपटात त्याने गुंडाची भूमिका वठविली होती. याच चित्रपटात धर्मेंद्र या बॉलिवूडच्या गाजलेल्या बुजुर्ग अभिनेत्याचीही एक भूमिका होती. 'पंजाबमधील लोक शांतताप्रिय आहेत; पण राजकीय स्वार्थासाठी तरुणांना गुंडगिरीकडे वळण्यासाठी कसे प्रवृत्त करण्यात येते याचे वास्तववादी चित्रण या चित्रपटात आहे' असे त्यावेळी सिद्धू म्हटला होता. अर्थात चित्रपटांत सिद्धू आला तो बराच नंतर.

त्या अगोदर त्याने मॉडेलिंगच्या क्षेत्रात नशीब आजमावले. मॉडेल हंट -म्हणजे मॉडेल निवड -स्पर्धांत त्याने भाग घेतला आणि तेथे तो विजयी ठरला. अर्थात मॉडेलिंगच्या क्षेत्रात तो फारसा रमला नाही आणि त्याने आपला मोर्चा वकिलीकडे वळविला. कारण त्याने कायद्याचे शिक्षण घेतलेलेच होते. काही मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा कायदेशीर सल्लागार म्हणून त्याने काही काळ काम केले. या कंपन्या भारतातील होत्या, तद्वत परदेशी देखील होत्या. फाडफाड इंग्रजी बोलण्याचा त्याला सराव आहे तो तेव्हापासून. बालाजी टेलिफिल्म्सचा कायदेशीर सल्लागार म्हणून काम करताना त्याची गाठ एकता कपूरशी पडली आणि तिनेच सिद्धूला अभिनयाच्या क्षेत्रात शिरण्याचा सल्ला दिला. अर्थात त्याने तो लगेच अमलात आणला नाही. पण, २०१५ मध्ये ‘रमता जोगी’ या एका तमिळ चित्रपटाच्या पंजाबी रिमेक चित्रपटात त्याने काम केले. हा चित्रपट चांगला चालला. त्यानंतर गेल्या तीन चार वर्षांत सिद्धूने २०१७ च्या जोरा दस नंबरीया या चित्रपटासह काही चित्रपटांत काम केले आणि नाव कमावले. गेल्या वर्षी ‘जोरा’च्या दुसऱ्या भागाचे प्रदर्शन झाले ते अगदी करोना उंबरठ्यावर असताना.

राजकारणाशी सिद्धूचा तसा जवळचा संबंध नव्हता. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि अभिनेता सनी देओल यांच्या प्रचारात सिद्धूने भाग घेतला. तेव्हाची आणि त्यानंतरची काही छायाचित्रे आता सोशल मीडियावर फिरत आहेत. या छायाचित्रांत सिद्धू सनी देओल, पंतप्रधान मोदी यांच्यासह दिसत आहे. तेव्हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यात सिद्धूचा हात आहे, असे आरोप होतानाच सिद्धूची भाजपची जवळीक आहे याकडे अंगुलीनिर्देश होत आहे, त्याला या छायाचित्रांची पार्श्वभूमी आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबमध्ये आंदोलन सुरु झाले आणि त्यात सिद्धू सहभागी झाला. त्यानंतर सनी देओलने सिद्धूशी आपले कोणतेही संबंध नाहीत, असा खुलासा केला होता आणि आता त्याचाच पुनरुच्चार देओलने केला आहे. किंबहुना यापूर्वी शेतकरी आंदोलन सुरु झाल्यावरही खुद्द सिद्धूने आपण देओलला आपला भाऊ मानतो आणि त्यामुळे आपण त्याचा प्रचार केला होता; मात्र आपण भाजपचे समर्थक नाही असे म्हटले होते. अर्थात तरीही त्या छायाचित्रांचे पडसाद उमटत राहणार हे निश्चित.

शेतकरी आंदोलन सुरु झाल्यावर गेल्या वर्षीच्या २५ सप्टेंबर रोजी जो बंद पुकारण्यात आला तेव्हा सिद्धू त्यात उतरलाच असे नाही तर सक्रिय झाला. दिल्ली आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर सिद्धू आणि अन्य काही कलाकारांनी कृषी कायद्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलनाची हाक दिली. त्यासाठी त्याने सोशल मीडियाचा भरपूर वापर केला. त्याच सुमारास हरयाणामधील एका पोलिस अधिकाऱ्याशी उच्च प्रतीच्या इंग्रजीत बोलतानाची त्याची चित्रफित सोशल मीडियावर फिरू लागली आणि हा इंग्रजी बोलणारा शेतकरी कोण, अशा खिल्लीचा सामना त्याला करावा लागला. तथापि ‘शेतकऱ्याने विद्यापीठात जाऊ नये का? अजूनही आपण जुन्या विचारसरणीतच रमणार का?’ असा प्रतिसवाल त्याने केला. अभिनेता म्हणून आपल्याला अधिक प्रसिद्धी लाभावी म्हणून सिद्धू या आंदोलनात उतरला आहे असेही आरोप झाले. तेही सिद्धूने अमान्य केले आणि आपण दहा वर्षे मुंबईत राहत असलो तरी आपल्या मातीशी आपले इमान कायम आहे आणि त्या तळमळीतूनच आपण या आंदोलनात आपण उतरलो आहोत असे स्पष्टीकरण त्याने दिले. 

शंभू सीमेवर ठिय्या आंदोलनाला विशेषतः तरुणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आणि मग प्रदीर्घ काळ हे ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा सिद्धूने निर्णय घेतला. अर्थात यात शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा कट्टरवादी भूमिका मांडल्या जाऊ लागल्याचे आढळतातच अन्य शेतकरी संघटनांनी सिद्धूला आपल्या व्यासपीठावर येण्यास मज्जाव केला. याला कारण ठरली सिद्धूच्या भाषणात तो उद्धृत करत असलेली भिंद्रनवालेची वक्तव्ये. खलिस्तानवाद्यांचा शेतकरी आंदोलनाशी काहीएक संबंध नाही हे स्पष्ट करून शेतकरी संघटनांनी सिद्धूपासून दूर राहणेच पसंत केले. अर्थात सिद्धू एकीकडे अमेरिकेतील कृष्णवर्णीय नेता मार्टिन लुथर किंगला उद्धृत करीत असे आणि दुसरीकडे भिंद्रनवालेला. हे खटकणारे होते.

२६ जानेवारीला दिल्लीत जे घडले त्याने सिद्धूवर टीकेची राळ उठली आहे. विशेषतः तो लाल किल्ल्यात काय करीत होता. असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तेथे शिखांचा झेंडा फडकविण्यात आला त्याचेही सिद्धूने नंतर समर्थन केले आहे. ट्रॅक्टर रॅलीचे रूपांतर विध्वंसक हिंसाचारात झाले, त्याचे मोठे खापर सिद्धूवर फोडले जात असताना शेतकरी संघटनानी सिद्धूला आंदोलनाला बदनाम करणारा खलनायक ठरविले आहे; तर सिद्धूने या संघटना डाव्या पक्षांच्या राजकीय अजेंड्यावर चालत आहेत, असा आरोप केला आहे. एक खरे, सिद्धूचा विशेषतः गेल्या दोन महिन्यांचा प्रवास हा लोकप्रियतेकडून वादग्रस्ततेकडे झाला आहे. 'दीप' प्रकाशही देऊ शकतो किंवा भडकाही उडवू शकतो. या 'दीप' ने आगलाव्याची भूमिका साकारली नाही ना हे तपासांती सिद्ध होईलच.

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)