पर्रीकरांना खोटे ठरवू नका : पराशर

लोबो यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


26th January 2021, 12:09 am
पर्रीकरांना खोटे ठरवू नका : पराशर

फोटो : पराशर पै खोत
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : मंत्री मायकल लोबोंशी चर्चा करूनच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा माईल्स टॅक्सी अॅपला परवाने दिले होते. पण आता पर्रीकर हयात नसल्याचा फायदा घेत मंत्री लोबो त्यांनाच खोटे ठरवत आहेत, असा दावा गोवा माईल्सचे ऑपरेशन संचालक पराशर पै खोत यांनी केला.
गोवा माईल्स अॅपबाबत मंत्री लोबो यांनी सोमवारी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोवा माईल्सने टेंडर जिंकले त्यावेळी पर्रीकरांनी लोबोंना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली होती. तत्कालीन पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्रालही तेव्हा उपस्थित होते. त्यावेळी लोबोंनी पर्रीकरांसमोर गोवा माईल्सला पूर्ण पाठिंबा दिला होता. आता विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ते अॅपला विरोध करत आहेत, असे पराशर पै खोत म्हणाले.
राज्यात दहा हजारांपेक्षा कमी टॅक्सी आहेत. त्यांतील अनेकांनी गोवा माईल्समध्ये प्रवेश केला आहे. पण मंत्री लोबो मात्र राज्यात २५ हजार टॅक्सी असल्याचा चुकीचा संदेश देत आहेत. लोबोंच्या म्हणण्यानुसार २५ हजार टॅक्सी आहेत तर आमच्या विरोधासाठी केवळ शंभर ते दीडशे जणच का असतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही गोवा माईल्स सेवेचे कौतुक केले आहे. केवळ मूठभर टॅक्सीमालक स्वार्थासाठी गोवा माईल्सविरोधात काम करत आहेत. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून गोव्याच्या विकासासाठी झटत असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्याशी चर्चाच बंद केली पाहिजे, असेही खोत यांनी नमूद केले.
गोवा माईल्सचे प्रत्युत्तर
१) गोवा माईल्सला परवाने देताना मनोहर पर्रीकरांनी मायकल लोबोंना विश्वासात घेतले होते.
२) दाबोळी विमानतळावरील काऊंटर पर्यटन महामंडळाचे आहेत. तेथे गोव्याच्या पर्यटनाची जाहिरात केली जाते. गोवा माईल्स तेथील काऊंटरद्वारे अॅप डाऊनलोड करण्याची माहिती पर्यटकांना देते. तेथे तिकीट दिले जात नाही किंवा ग्राहकांकडून पैसेही घेतले जात नाहीत.
३) गोवा माईल्सच्या चालकांकडे बॅच नसल्याचे लोबोंनी दाखवून द्यावे. आम्ही त्यांना तत्काळ निलंबित करतो.
४) गोवा माईल्स अॅप सेवा कायदेशीर आहे. आम्ही स्थानिक, पर्यटकांना प्रामाणिक, पारदर्शक सेवा देत आहोत. यापुढे गोवा माईल्सला त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ.
५) स्थानिक टॅक्सीमालक आणि गोवा माईल्समधील वादावर केवळ टॅक्सी मीटर हाच तोडगा आहे.

हेही वाचा