शब्दकोशकार डॉ. वामन नायक

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
24th January 2021, 12:31 pm
शब्दकोशकार डॉ. वामन नायक

वामन नायक हे सक्रिय शब्दकोशकार. त्यांचा जन्म १ मार्च १९५४ रोजी साळगाव येथे झाला. एमए (अर्थशास्त्र), एमए (समाजशास्त्र), एमफिल, पीएचडी (अर्थशास्त्र- मुंबई) पदव्या घेतल्या. त्यांनी कायद्याचाही अभ्यास केला आहे. एमफिल, पीएचडी पदवी घेणाऱ्यांसाठी त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. 

धेंपो महाविद्यालयात त्यांनी १९७८ मध्ये प्राध्यापक म्हूण काम करायला सुरुवात केली. तेथे २९ वर्षे नोकरी करून ते प्राचार्य पदापर्यंत पोहोचले. निवृत्ती घेऊन नंतर ते पुण्याच्या सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये व आता तेथीलच आयएसबी महाविद्यालयात गेली दहा वर्षे ते प्राचार्य आहेत. अनेक शाळांमध्ये, सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी करियरवर मार्गदर्शन केले आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवर त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. 

त्यांनी विद्यापीठांच्या समित्या, अभ्यास मंडळांवर विविध पदे भूषविली आहेत. महाविद्यालयात असताना त्यांनी कोकणीत लिहायला सुरुवात केली. १९७४ पासून ते कोकणी क्षेत्रात आहेत. बार्देश कोकणी भाषा मंडळाचे ते सदस्य होते. ते इग्नू, व्हीसीएमओयूचे मान्यताप्राप्त सदस्य आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी कोकणी भाषांतरही केले आहे. 

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. इंग्रजीत अर्थशास्त्रावर नऊ, कोकणीत वेध फुडाराचो, इंग्रजी- कोकणी समान व विरुद्धार्थी शब्दकोश, इंग्रजी- इंग्रजी- कोकणी अर्थशास्त्र शब्दकोश (प्रकाशित व्हायचा आहे.), राष्ट्रीय अनुवाद मिशनतर्फे त्यांचे हिंद स्वराज्य प्रसिद्ध झाले आहे. मनुष्यबळ व्यवस्थापन, करियर प्लॅनर स्ट्रेटजिस फाॅर सस्टेनेबल रुरल डेव्हलोपमेंट ही त्यांची पुस्तके. आता ते अर्थशास्त्र, समाजशास्त्र, प्रशासन, संविधान, कायदा अशा विषयांच्या शब्दांचा अर्थ कोकणी, इंग्रजी व हिंदीतून सांगणारा कोष तयार करणार आहेत. त्यांनी वांगडी नावाचे मासिक सुरू केले होते. नंतर ते त्रैमासिक व पुढे वार्षिक झाले. गोव्यातील बहुतेक शाळा त्याच्या वर्गणीदार होत्या. ते इंग्रजी, मराठी व कोकणीतून वृत्तपत्रांत लेखनही करतात. प्रिंट व इलेक्ट्राॅनिक्स माध्यमासाठी त्यांनी सल्लागार म्हणून कामही केले आहेत. त्यांचे घर मेरशी येथे आहे. त्यांना भावी कार्यात शुभेच्छा. 

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)