मुलांच्या चिंताजनक आत्महत्या

कॅलिडोस्कोप

Story: मनोहर जोशी |
24th January 2021, 12:30 pm
मुलांच्या चिंताजनक आत्महत्या

इयत्ता पाचवीतल्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात वाचले आणि अस्वस्थ झालो. पाचवीतल्या म्हणजे त्या मुलाचे वय फारतर दहा- अकरा वर्षाचे असेल. काळोखाचीसुद्धा भीती वाटण्याचे हे वय. या वयात त्याला या शब्दाचा अर्थ, त्यातले गांभीर्य, त्याचे परिणाम हे तरी कळले असतील का? का माध्यमांवरील पाहिलेल्या एखाद्या दृश्याप्रमाणे आपणही हे करू या इतक्या सहजपणे त्याने हे कृत्य केले असेल? बरं कारण काय तर आजोबा रागावले. आत्महत्या करण्याचे हे कारण असू शकते? त्या आजोबांची अवस्था काय झाली असेल? त्या मुलाच्या आईवडिलांची मानसिक स्थिती काय झाली असेल? या सारख्या विचारांनी डोकं बधिर झालं.

मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या अधूनमधून येत असतात आणि त्या वाचल्या की प्रत्येक वेळी हळहळ वाटल्याखेरीज रहात नाही. काही वर्षांपूर्वी नववी, दहावीतल्या असेल एका मुलाने मोबाईल दिला नाही म्हणून इलेक्ट्रिक वायरचे इन्सुलेशन काढून आतली तांब्याची तार शरीराभोवती गुंडाळली, सॉकेटमध्ये पिन घातली आणि स्वतःच्या हाताने स्विच ऑन केले. वाचताना सुद्धा अंगावर काटा उभा राहावा, असे हे कृत्य करण्याचे धाडस त्याला कसे झाले असेल? नववीत शिकणाऱ्या एका मुलीने परीक्षा जवळ आली म्हणून आई मोबाईल देत नाही या कारणास्तव आत्महत्या केली. स्पर्धा परीक्षेला बसलेल्या एका हुशार मुलाने आपण मेरिटमध्ये येऊ की नाही या भीतीने निकालाच्या आदल्या दिवशीच आत्महत्या केली. अशी एक ना दोन अनेक उदाहरणे आहेत.

जीवन म्हणजे काय हे सुद्धा ज्यांना कळले नाही अशा कोवळ्या वयातल्या मुलांनी अकाली त्यांचे जीवन संपवावे हे त्यांच्या पालकांसाठी आणि एकूण समाजासाठीसुद्धा अत्यंत क्लेशदायक आहे. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांनी आणि विशेषतः पालकांनी गांभीर्याने विचार करायला हवा. एकत्र कुटुंब पद्धत असताना मुलांवर नकळत अनेक चांगले संस्कार होत असत. बदलत्या काळानुसार कुटुंब व्यवस्था विस्कळीत होणे काहीसे अपरिहार्य आहे. पण, संस्कारांची उणीव भरून काढण्यासाठी, मुलांच्या अविचारी कृत्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक ती तडजोड करून कुटुंब व्यवस्था बळकट करणे अतिशय गरजेचे आहे. केवळ चार माणसे एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नव्हे. त्यांच्यात भावनांचे बंध निर्माण होऊन नात्याची वीण घट्ट व्हायला हवी. त्याच्यासाठी ती जास्तीत जास्त एकमेकांच्या सहवासात यायला हवीत. त्यांच्यात संवाद व्हायला हवा, एकमेकांविषयी विश्वास, जिव्हाळा वाटायला हवा. पण, दुर्दैवाने तो आजच्या कुटुंबात घटत चालला आहे. कारण आजकाल कुणाला वेळच नाही.

आजचे जग गतिमान झाले आहे, स्पर्धात्मक झाले आहे हे खूप वेळा ऐकले आहे. जग भले कितीही गतिमान होवो, पण आपली क्षमता आणि परिस्थिती लक्षात घेऊन कुटुंब टिकवून ठेवण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी म्हणून बहुतांशी दोन्ही पालक नोकऱ्या करतात. घरात मूल एकटेच असते. विशेषतः लहान मुलाची भावनिक वाढ, योग्य ते संस्कार होण्याच्या दृष्टीने आईचा सहवास हा अत्यंत मोलाचा असतो. आई हे मुलाचे दैवत असते. तिने आपल्याला जवळ घ्यावे, घास भरवावा, हट्ट पुरवावे असे वाटत असते. मुलाला खूप काही सांगायचे असते, भावना प्रकट करायच्या असतात. आणि त्या प्रगट करायला आई हे मुलाच्या दृष्टीने सर्वात विश्वासाचे ठिकाण असते. पण तेच मिळाले नाही तर मूल एकलकोंडे बनते. त्याच्या भावनांचा कोंडमारा होतो. काही वेळा तो चुकीच्या मार्गाकडे नेतो तर काही वेळा त्याचा स्फोट होतो. जीवनमान उंचावण्यासाठी नोकरी हा अर्थार्जनाचा एकमेव मार्ग नाही. घरात राहून अर्थार्जन करण्याचे आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातला शक्य होईल तो मार्ग निवडावा जेणेकरून दोन्हीही हेतू साध्य होतील. कदाचित ऐषआरामी जीवन जगता येणार नाही. पण महत्वाचे म्हणजे कुटुंब टिकून राहील. मूल मोठं होईपर्यंत त्याला आईचा सहवास मिळणे हे अनिवार्य आहे. पाळणाघर, बेबी सीटिंग किंवा घरात आया ठेवणे हा त्याला पर्याय नाही.

हल्ली पालकांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. बहुतेक घरात एकच मूल असते. त्यामुळे मुलांचे अतोनात किंबहुना फाजील लाड होतात. आपल्याला मिळाले नाही निदान आपल्या मुलाला तरी मिळावे ही त्यामागची भावना असते. विचार चांगला आहे, पण त्याचा अतिरेक झाला तर त्याचे दुष्परिणाम होतात हे पालकांच्या लक्षात येत नाही. मुलाला काय द्यावे आणि काय देऊ नये याचा विवेक पालकांनी करायला हवा. हेच ते वय आहे ज्या वयात मुलांना नकार पचविण्याच्या, आहे त्या परिस्थितीत तडजोड करून राहण्याच्या, सहन करण्याच्या, दुसऱ्याला सहकार्य करण्याच्या क्षमता रुजवाव्या लागतात. आपल्याला मागेल ते मिळते ही सवय लहान वयात लागली की मग तो त्यांचा स्वभाव बनतो आणि मोठेपणी एखादी गोष्ट मिळाली नाही की ते स्वीकारता न आल्याने मग ते टोकाची भूमिका घेतात.

टीव्ही, मोबाईल यासारखी साधनं मुलांच्या भावविश्वात प्रचंड उलथापालथ घडवून आणतात. काय बघावं किंवा बघू नये हे समजण्याचं त्यांचं वय नसतं तसंच ते सांगणारंही घरात कोणी नसतं. त्यामुळे मुलं जे दिसतं ते बघतात. त्यांच्या परीने त्याचा अन्वयार्थ लावतात आणि आपल्या जीवनातही तसंच असावं अशी अपेक्षा ठेवतात. घरात संवाद नसल्यामुळे जे दिसतं तसं नसतं हे त्यांना कळत नाही. आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही हे पाहून नकळत त्यांच्या मनात सुप्त संघर्ष सुरु होतो. आणि मुलं भावनिक दृष्ट्या दुरावतात. पडद्यावरची हिंसक दृश्ये पाहून कमालीची असंवेदनशील बनतात आणि ‘त्याने काय सॉलिड खून केलाय’, अशा प्रकारची वाक्ये सहज बोलून जातात. प्रक्षोभक दृश्ये पाहून चुकीच्या मार्गाला लागतात. मुलांच्या या एकूणच वागण्याचा पश्चात्ताप करण्याची पाळी नंतर पालकांवर येते.

ही वेळ येऊ द्यायची नसेल तर वेळीच आपली कुटुंब व्यवस्था सक्षम करायला हवी.

(लेखक साहित्यिक आहेत.)