'डाव तुझा येताच जमविशी, जपून आपली खेळी'!

स्पॉटलाइट

Story: राहूल गोखले |
24th January 2021, 12:29 pm
'डाव तुझा येताच जमविशी, जपून आपली खेळी'!

मोठेपणा मिळविण्यात जिद्द, चिकाटी, मेहनत, उमेद, टीकेने न खचता लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणे, हे घटक किती कारणीभूत असतात याचा प्रत्यय ऋषभ पंतच्या क्रिकेट कारकीर्दीकडे पाहिले की येऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने जो निर्धारपूर्वक विजय मिळविला, त्यात ऋषभ पंतचा मोठा वाटा होता. नाबाद ८९ धावा ठोकत विजयाचा चौकार ठोकत पंतने विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर ऋषभची सार्वत्रिक प्रशंसा सुरु झाली. याच ऋषभवर काहीच काळापूर्वी टीकेचे बाण सोडले जात होते, याचे बहुधा या जल्लोषाच्या वातावरणात सर्वांनाच विस्मरण झाले असावे.

ऋषभवर त्याच्या खेळीतील बेफिकिरीमुळे टीका होत असे आणि ही फार जुनी गोष्ट नाही. त्यावर बोलताना एकदा ऋषभने सांगितले होते की 'माझे वय केवळ एकवीस वर्षांचे (त्यावेळी) आहे; मी तीस वर्षांच्या माणसासारखा विचार करू शकत नाही; आणि माझ्यात बदल एका रात्रीत होऊ शकत नाही; तथापि मी माझ्यावरील टीका सकारात्मकेतने घेतो आणि चुका आणि अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करतो'. ऋषभ जे म्हटला त्याचा पुरावा त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयी खेळीतून दिला. 

ऋषभने नशीबापेक्षा मेहनतीवर लहानपणापासून भर दिला आहे. उत्तराखंडच्या रुरकी येथे जन्मलेल्या ऋषभचा क्रिकेटचा सराव सुरुवातीला त्याच्या घराच्या गच्चीत होई. लहानग्या ऋषभच्या छातीला उशी बांधून मग त्याचे वडील राजिंदर पंत आपल्या मुलाला कॉर्कचा चेंडू टाकत. आपल्या मुलाची या प्रकारच्या चेंडूला सामोरे जाण्यातील भीड चेपावी हा त्यामागील उद्देश. त्यातून ऋषभचा आत्मविश्वास वाढला आणि मग शाळा सुटल्यानंतर क्रिकेटच्या सरावासाठी तो थांबत असे. त्यासाठी सकाळी खाण्याचे दोन डबे घेऊन तो निघत असे, जेणेकरून शाळेनंतर क्रिकेटच्या सरावासाठी पुरेसा वेळ मिळावा. आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये असणारी गती पाहून वडील राजिंदर आणि आई सरोज यांनी ऋषभला दिल्लीतील तारक सिन्हा यांच्या हाताखाली प्रशिक्षणासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला. रुरकी ते दिल्ली हा प्रवास काही सोयीचा नव्हता. मात्र दर शनिवारी आणि रविवारी प्रशिक्षण असे आणि त्यासाठी ऋषभची आई आपल्या लहानग्या मुलाला पहाटे तीनच्या बसने रुरकीहून दिल्लीला नेत असे. हा पाच तासांचा प्रवास आणि मग वास्तव्य एका गुरुद्वारात. तेव्हा स्वतः ऋषभच्या या खडतर वाटचालीतून आणि घरच्यांच्या सक्रिय प्रोत्साहनातून आजचा ऋषभ घडला आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. अर्थात त्याच्या जडणघडणीत ज्यांचा मोठा वाटा होता ते त्याचे वडील मात्र त्याचे हे यश पाहण्यास आता हयात नाहीत. त्यांचे २०१७ मध्ये निधन झाले.

ऋषभने अद्यापी वयाची पंचविशी देखील गाठलेली नसली तरी त्याच्या आजवरच्या कारकीर्दीत अनेक चढउतार आले आहेत, हे नाकारता येणार नाही. २०१५-१६ मध्ये त्याने रणजी सामन्यात दिल्लीकडून पदार्पण केले आणि त्या पुढच्याच वर्षी महाराष्ट्राच्या संघविरोधात खेळताना एका डावात ३०८ धावा ठोकल्या आणि रणजीमध्ये त्रिशतक ठोकणारा तिसरा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. २०१६ मध्ये झारखंडच्या विरुद्धच्या सामन्यात ऋषभने केवळ ४८ चेंडूत शतक ठोकले. भारताकडून अंडर-१९ मध्ये खेळण्याची संधी ऋषभला मिळाली आणि आयपीएलमध्ये २०१६ मध्येच दिल्ली डेअरडेव्हील्सतर्फे त्याला तब्बल १.९ कोटी रुपयांत संघात समाविष्ट करण्यात आले. आयपीएलच्या संघमालकांचे लक्ष वेधले जावे, यातच ऋषभ हा उगवता तारा आहे याचे लक्षण होते. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत, त्यानंतर २०१८ मध्ये एकदिवसीय सामना प्रकारात त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले आणि त्याच वर्षीच्या डिसेंबरात त्याची निवड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठीच्या भारतीय संघात झाली. तेथेही पहिल्याच सामन्यात त्याने यष्टिरक्षक म्हणून अकरा झेल घेतले आणि चौथ्या सामन्यात त्याने शतक ठोकले. तेव्हा खरे तर ही कामगिरी दमदार होती.

मात्र, तरीही धोनीची जागा तो घेऊ शकतो असा विश्वास बहुधा क्रिकेट निवड समितीला वाटला नसावा नि त्यामुळे २०१९ च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी ऋषभची संघात निवड झाली नाही. त्यावरून गदारोळही उठला. अगदी अभिनेता ऋषी कपूरनेदेखील ट्विट करून पंतला संघात का घेतले नाही असा जाहीर सवाल विचारला होता. खुद्द ऋषभने आपण निराश झालो असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, धोनीला 'बॅक अप' म्हणून दिनेश कार्तिकची निवड झाली होती आणि ऋषभचा मार्ग खुंटला होता.

लवकरच शिखर धवन याला झालेल्या दुखापतीमुळे ऋषभचे आगमन विश्वचषक स्पर्धेत झाले. तेथे त्याने चार सामन्यांत भाग घेतला. तरीही ऋषभला पुढे देखील संघातून वगळण्याचे सत्र थांबले नाहीच. यष्टिरक्षक म्हणून त्याने सोडलेले काही झेल आणि फलंदाज म्हणून बेदरकार खेळी आणि मुख्य म्हणजे सामना विजय मिळवून संपवल्याचा तुरा शिरपेचात नाही अशी कारणे देत ऋषभला न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय किंवा टी -२० सामन्यांत मध्ये खेळविण्यात आले नाही किंवा नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील एकदिवसीय आणि टी -२० संघात त्याला जागा देण्यात आली नाही. कसोटी सामन्यात ऋषभला चमूत स्थान मिळाले खरे मात्र तेथेही अडलेड येथील पिंक-बॉल सामन्यात त्याला दूरच ठेवण्यात आले. नंतर सिडनी, मेलबर्न आणि गॅबा येथील सामन्यात त्याला संधी मिळाली आणि चढत्या भाजणीने त्याने त्या संधीचे सोने केले. सिडनीत त्याने ९७ धावा ठोकल्या; मात्र, यष्टिरक्षक म्हणून काही झेल सोडल्याचे गालबोट लागलेच. गॅबा येथे मात्र ऋषभने सारी कसर भरून काढली. भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देतानाच त्याने आपण आता बेदरकार फलंदाज नसून अधिक परिपक्व झाल्याचे दर्शन घडविले आणि त्याच्यावर टीका करणाऱ्यांना आपल्या कामगिरीतूनच उत्तर दिले.

ऋषभ मानसिकदृष्ट्या खंबीर आहे, असे त्याचे परिचित सांगतात. त्याच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यावर त्यांच्यावर अंत्यविधी करून आयपीएल स्पर्धेचा सराव करण्यासाठी तो परतला आणि प्रत्यक्ष सामन्यात ३३ चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. आताही मध्यंतरी संघातून वगळलो गेल्याचे शल्य न बाळगता तो सराव करत राहिला आणि गॅबामध्ये आपल्या बॅटची कमाल दाखविली. सुनील गावस्कर यांच्या आवाजात असलेल्या 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा ' या गीतातील 'काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी' या पंक्ती ऋषभला तंतोतंत लागू पडतात. तथापि लोकनिंदेने खचून न जाता आणि जनस्तुतीने हुरळून न जाता ऋषभ पंतने खेळाशी निष्ठा अशीच ठेवली तर त्याचे भारतीय संघातील स्थान कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)