वटवृक्षाच्या आश्रयास

आठवण

Story: सुरेखा दीक्षित [email protected] |
24th January 2021, 12:26 pm
वटवृक्षाच्या आश्रयास

थोर माणसे स्वतः कष्ट सहन करून जवळच्या लोकांना शीतल सहवासाची छाया देतात. कधी कधी जीवनात असेही बघायला मिळते की महान लोकांची महती निकटच्या संबंधितांना उमगतच नाही. सज्जनांची खरी ओळख पटायला सभोवतीच्या व्यक्तींना कधी कधी वेळ लागतो. एखाद्या व्यक्तीचे जगात नसण्याने त्याच्या असण्याचे मूल्य कळते.

माझे काका, म्हणजेच स्व. माधव गोविंद वैद्य यांच्या स्वर्गवासानंतर अनेकांना त्यांच्या मोठेपणाचे महत्व अधिकच प्रकर्षाने जाणवले. मलाही काही गोष्टी आवर्जून जाणवल्या, त्या आप्तस्वकीयांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्या शब्दबद्ध करत आहे. तसे पाहू जाता काकांच्या व्यक्तिमत्वाचा, कर्तृत्वाचा घरात तसेच बाहेरही दरारा होता. त्यांनी स्वतः कधीही लहानांपासून थोरांपर्यंत वागताना आपला बडेजाव मिरवला नाही. एखाद्या महनीय व्यक्तीला मानमरातब मिळावा एवढे उत्तुंग कर्तृत्व त्यांचे नक्कीच होते. पण, त्यांनी ते ओझे कधी बाळगले नाही. तरीही त्यांच्याविषयी नातेवाईकांमध्ये आदरयुक्त धाक होता. वय उतरणीला लागल्यावर त्यांच्या स्वभावातील स्निग्धता वाढत गेली आणि आमच्यासारखे लिंबूटिंबू धारिष्ट करून मोकळेपणी त्यांच्याशी बोलायला लागले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील त्यांचे स्थान वादातीत होते. परमपूज्य गुरुजींच्या कालखंडापासून काकांनी संघातील स्थित्यंतरे जवळून बघितली असल्याने संघविषयक घटनांचा ते चालता-बोलता विश्वकोशच होते. मी मा. एकनाथजी रानडे यांच्यावर 'एक जीवन- एक ध्येय' हे चरित्र लिहिले. त्याची प्रस्तावना लिहिण्याची विनंती काकांना केली. ती त्यांनी मान्य तर केलीच, पण अनवधानाने एका ठिकाणी चुकीचे साल लिहिले ते दुरुस्त करून दिले. तब्बल तीन वेळा त्यांनी पुस्तकाचे टंकलेखन (प्रूफ रीडिंग) तपासून दिले. केवढा हा साधेपणा म्हणायचा!

 सार्वजनिक जीवन आणि वैयक्तिक जीवन यात त्यांच्यामध्ये अद्वैत होते. वेळ पाळणे असो वा शब्द, नातेसंबंध असो व सामाजिक स्नेहबंध, व्यवहार असो की जमाखर्चाचा ताळमेळ सगळेच त्यांच्या लेखी समान होते. नियमांना धरूनच व्यक्तिगत जगणे होते. 'मी आणि माझं' या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी 'संघातला मी आणि माझ्यातला संघ' या लेखात संघशैलीविषयी जे विचार व्यक्त केले आहेत ते सर्व स्वयंसेवकांनी अनुसरावेत, असे आहेत. ते लिहितात, संघ एक जीवनशैली आहे. मानव जीवनाच्या परिवर्तनाची, जीवनाच्या मूल्यभानाची आणि ते भान ठेवून व्यक्तीच्या जीवनाची शैली बनविण्याची अपेक्षा ठेवणारी ही संघटना आहे. व्यक्तीचे संघात येणे येथे पुरेसे मानले जात नाही. त्या व्यक्तीत संघ किती उतरला आहे, हे निरंतर बघण्याचा आग्रह संघ धरतो. त्यांनी संघाची मूल्ये अंगात मुरवली होती. ते म्हणतात, 'संघाची शिकवण हा माझ्या जीवनाच्या वाटचालीचा ध्रुवतारा बनला. त्यामुळे खाजगी जीवनातही मला ध्येय सोडण्याची गरज पडली नाही.'

वैद्य कुटुंबांचा वंशवृक्ष खूप विस्तारला आहे. तरुण पिढीने विचारांचा वारसा अंगी बाणवायला हवा तसेच संघात येणाऱ्या नवीन स्वयंसेवकांनी हे विचारधन जोपासायला पाहिजे. मी गोव्यात राहते. त्यामुळे येथे संघ किती रुजला हे सूज्ञास सांगणे न लगे.

वैद्यांच्या वृक्षवेलीबद्दल काकांनी 'मी व माझं' पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. माझे वडील भा. गो. उपाध्य अण्णाजी वैद्य आणि धाकटे काका श्री. गो. उपाख्य नानाजी वैद्य यांचीही ओळख करून दिली आहे. तसे पाहिले तर तिघांही बंधूंनी आपापल्या क्षेत्रात समाजासाठी भरपूर कार्य केले आहे. माझ्या वडिलांचे थोरल्या बंधूंवर म्हणजे बाबुरावांवर केवळ प्रेमच नव्हते तर अपार श्रद्धा होती. कोणतीही गोष्ट त्यांनी काकांना सांगितल्याशिवाय केली नाही. दोघांचीही शेती बाबा तरोड्याला स्थायिक होईपर्यंत काकाच सांभाळीत. माझे वडील काकांच्या पाठचे भाऊ. साधारणपणे लहानपणी अशा भावंडांचे पटत नाही, असे म्हणतात. पण, या दोघांमध्ये अतूट सख्य होते. कदाचित घरापासून दूर नागपूरला हाल-अपेष्टात विद्याग्रहणासाठी रहावे लागले व सर्व सुखदुःखात वाटेकरी होऊन जीवनात वाटचाल केली असावी, म्हणूनही ते असेल.

लहानपणीच आई गेल्याने पाठीवर फिरणारा मायेचा हात पारखा झाला होता. आई गेली तेव्हा काकांनी कुमारवयात म्हणजे आजच्या भाषेत टीनेजरमध्ये पदार्पण केले होते. काकांनी आईच्या मृत्यूचा प्रसंग वर्णन केला आहे. तो वाचून कवी ग्रेस यांच्या आईवरील, 'ती गेली तेव्हा...' कवितेची आठवण होते. खास करून 'अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे...' ही ओळ विशेष लक्षात राहते. आईची सय काकांना आयुष्यभर येत होती. इतके मोठेपण मिळालेला माणूस आईच्या आठवणीने किती व्याकूळ होऊ शकतो हे कळते. 

काकांनी समाजकार्य आणि गृहस्थ जीवन यांची सुरेख सांगड घातली होती. अर्थात काकूंची त्यांना पुरेपूर साथ होती म्हणूनच ते शक्य झाले. नातेवाईकांकडे कार्य प्रसंगाला जाणे, घरातील कुळाचार पाळणे, पाहुण्यांचे स्वागत याबाबतीत काका कुठेही कमी पडले नाहीत. आवर्जून उल्लेख करावा अशी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी केलेली रुग्णसेवा. नागपूरला वैद्यकीय सोयी चांगल्या असल्याने नात्यातील बरीच मंडळी उपचारासाठी आली की मुक्काम काकांकडेच असे. माझे पती स्वर्गीय प्रभाकर दीक्षितांना पण त्यांनी आजारपणात आयुर्वेदाच्या वैद्याकडून उपचार घेण्यासाठी महिनाभर ठेवून घेतले होते. मीसुद्धा १९८७ मध्ये कॅन्सरच्या उपचारांसाठी वर्षभर नागपूरला येणे-जाणे करत होते. आजच्या पिढीला जिथे दोन दिवसही एखादा आगंतुक सहन होत नाही, त्यांना असे गरजू आप्तांना आश्रय देणारे कुटुंब समजणे जड जाईल.

माझ्या पतीच्या निधनानंतर काका, बाबा व आई मुंबईला आरक्षण नसताना प्रवास करून आले. भावना अनावर होऊ न देता ते जेव्हा पहाटे घरी पोहोचले, तेव्हा काकांचा लालबुंद चेहरा अजूनही स्मरणात आहे. बाबांचे दुःख तर डोळ्यांवाटे झरत होते. दोघेही बंधू अशा प्रसंगी एक दुसऱ्यासोबत असत. आजही चुलत भावंडांमध्ये तो जिव्हाळा कायम आहे. काकूंनीही कधी आपपर भाव केला नाही. सर्वांना बांधून ठेवण्याचे कसब या कुटुंबात बघायला मिळते.

 काका गुणग्राहक होते आणि त्याचबरोबर कार्यतत्परही. इतरांच्या गुणांना ओळखून त्याला प्रशंसेची पावती ते लगेच देत. आमच्या वडिलांच्या निधनानंतर तरोड्याला संध्याकाळी भगवद्गीता आणि उपनिषदांवर काकांचे प्रवचन असायचे. दहा दिवसात १८ अध्याय सामूहिक पठणाद्वारे आम्ही पूर्ण केले. एक दिवस काकांनी माझ्या स्वच्छ उच्चार व गीता पठणाचे कौतुक केले. एका संस्कृत विद्वानाकडून मिळालेली ती पावती कायम लक्षात राहील. खरे म्हणजे संस्कृत विषय पदवीसाठी माझ्या गळ्यात काकांच्याच शिष्याने प्रो. मधुकर आष्टीकर यांनी बांधला होता. केवळ मी त्यांची पुतणी आहे म्हणून अकरावीपर्यंत संस्कृतीचा गंध नसलेली मी मराठीच्या जोरावर संस्कृतमध्ये बरे गुण घेत होते. पुढे हाच विषय मला रोजीरोटीच्या कामी आला.

सर्व वैद्यकुलोत्पन्न वारसांना तसेच त्यांच्याशी नातेसंबंध नसलेल्या व्यक्तींना मा. गो. वैद्य यांचे आपले नाते आहे म्हणणे खूप गौरवाचे वाटते. काकांना स्वतःविषयी काय वाटत होते हे एका लेखात लिहिले आहे, 'मी खेड्यातील एका भिक्षुकाचा मुलगा, असंख्य लोकांना माहीत झाला, हे काय थोडेथोडके आहे. क्रमाक्रमाने संघ माझ्यात परिपूर्णतेने आला असे कसे म्हणता येईल? मी एवढे मात्र म्हणू शकतो, तो जेवढा आला तेवढा मी आणू शकलो याचे मला अत्यंत समाधान आहे. माझा सदरा सुखी व समाधानी माणसाचा. हे कृतार्थ जीवन जगण्याची कला ज्यांच्याकडून शिकावी, असे उत्तुंग व्यक्तित्व आपले निकटचे आहे हीच खूप अभिमानाची गोष्ट आहे.

अशा व्यक्तींच्या आश्रयास सर्वजण निश्चितपणे वावरत असतात. असं म्हणतात की मोठ्या वृक्षाखाली लहान रोपटी नीट वाढत नाहीत, परंतु वटवृक्षाचे तसे नसते. खांद्यापासून फुटलेली मुळे जमिनीकडे ओढ घेतात आणि कोणी दुखावले गेले वा छाटले नाहीतर तिथे घट्ट रुजतात व मूळ वृक्षाला आधार देतात. असा भलामोठा वटवृक्ष मी पुडुचेरीजवळील आॅरोविलोमध्ये मातृमंदिरासमोर बघितला आहे. कितीतरी पक्षी, किडे, खारी, सरपटणारे प्राणी या वटवृक्षाच्या आश्रयाला निर्भयपणे राहात आहेत. वृक्ष मात्र शांत, स्थिर आपल्या पारंब्यांच्या विस्तारासकट आकाशाकडे नजर लावून उभा आहे. श्रेष्ठ व्यक्तींचेही तसेच आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लोक समाजकार्यात पाय घट्ट रोवून थोर पुरुषांची सांस्कृतिक परंपरा सांभाळायला, विस्तारायला हातभार लावतात. समाजाला तोलून धरायला, आश्रय अन् आधार द्यायला अशा वटवृक्षासारख्या व्यक्तींची आवश्यकता असते. ती काकांनी पूर्ण केली.

 काकांचे जीवन म्हणजे ईश्वर योजनेचा भाग होता, असे आता वाटते. चार वैद्य भावंडांपैकी केवळ एक गोविंद तुकाराम वैद्य जगले. तीन मुले व चार मुली असा कुटुंब विस्तार झाला. काका चार मुलींनंतर झालेले ज्येष्ठ पुत्ररत्न! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिसस्पर्श होऊन जीवनाचे सोने झाले. संघाच्या सर्व सरसंघचालकांची कारकीर्द बघण्याचे भाग्य त्यांना लाभले. आपल्या पाचपैकी दोन उच्चविद्याविभूषित मुले डॉ. मनमोहन व डॉ. राम यांना संघ कार्यासाठी अर्पण केले. ९७ वर्षांचे दीर्घायुष्य ते सार्थक जगले. ही ईश्वरेच्छा काय दर्शविते? असे म्हणतात की एखादा कर्ता पुरुष घराण्यातील सात पिढ्यांचा उद्धार करतो. चौथ्या पिढीच्या आधीची माहिती वैद्यांना माहिती नाही. पण सर्वांचे नाव मात्र काका, माधव गोविंद वैद्य या व्यक्तीने उज्ज्वल केले हे खरे!

(लेखिका निवृत्त अध्यापक आहेत.)