जीवन एक प्रवास

टीपकागद

Story: प्रतिभा कारंजकर |
24th January 2021, 12:25 pm
जीवन एक प्रवास

प्रवास करणं मला आवडतं. मग तो कुठलाही असो, कधीही असो, कुठेही असो, दिवसा किंवा रात्रीचा. रेल्वे, बस, कार, विमान, पायी, दोनचाकी, चारचाकी, गजबजाटातला असो की नीरव शांततेतला. निसर्गरम्य प्रदेशातला असो की निर्जन वाळवंटी मरूमय प्रदेशातला; खेड्यातला, शहरातला. प्रवास आनंद देतो, ऊर्जा देतो, प्रेरणा देतो, जगण्याची नवी उर्मी देतो. लढण्याची शक्ति देतो. नवनवे ज्ञान देतो. हास्य देतो, मायेचा स्पर्श देतो, नवी उद्दिष्टे नवी ध्येय दाखवतो. माझ्यासारखा बरेच जणांना प्रवास आवडत असेल.   

सुख-दु:खाने व्याप्त असं आयुष्य हा ही एक मोठा जीवनप्रवासच असतो. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर बाह्य जगाशी संबंध जुळतो तिथूनच नव्या प्रवासाला सुरूवात होते. झगडत, नवीन नवीन गोष्टी शिकत आपण घडत जातो.  तसा प्रवास घडवतो, शिकवतो प्रेरणा देतो नवी ओळख देतो स्वतची आणि जगाची.  प्रवासात कोण कुठे कसा भेटेल हे सांगता येत नाही, पण ती भेट अविस्मरणीय ठरते, जीवन प्रवासात कालचा, पुढचा, मागचा, आताचा, येणार्‍या उद्याचा, संघर्षाचा आनंदाचा, हृदयाला भिडणार्‍या आठवणींचा असा वेगवेगळ्या स्वरूपातला प्रवास आपण अनुभवत असतो. 

प्रवास जो आपण या जगात जन्माला आल्यापासून सुरू करतो, या जगात पहिला श्वास घेतो तो क्षण म्हणजे सुरुवात असते प्रत्येकाच्या स्वतंत्र जगण्याची आणि पुढे तो चालूच रहातो. आई, वडील, भावंडे, शेजारी, मित्र, परिवार बरोबरीचे संगिसाथी बदलत असतात. काही कायम दीर्घकाळ त्याच्या जवळ रहातात काही मधेच सोडून जातात. किंवा पायउतार होतात आणि काही नवीन येऊन मिळतात. जसं रेल्वेच्या प्रवासात सुरवातीला असलेले थोडे लोक शेवटच्या स्टेशनापर्यंत बरोबर असतात तर काही आपल्या स्थानी उतरून जातात, रेल्वेचा चालक आपल्याला आपल्या इच्छित स्थानी पोचवण्याचं काम करतो. तसं जीवनात जे ध्येय आपण उराशी बाळगलं तिथपर्यंत पोचण्यासाठी गुरु मार्ग दाखवतो.  

हल्लीच बरेच दिवसांनी प्रवासाचा योग आला तोही कारने. तो करताना एक गोष्ट लक्षात आली. रस्ता अनोळखी होता, त्यावरच्या खाच- खळग्यांचा काही ड्रायव्हरला अंदाज येत नव्हता. त्याने मग एका गाडीला पुढे जाऊ दिलं आणि तो बरोबर त्याच्या पाठी- पाठी राहून चालवू लागला त्यामुळे पुढच्या गाडीला खड्डा आला, ती गाडी वरखाली होताना दिसली की हा आधीच सावध होत होता. तसं जीवनातही बरेचदा पुढच्यास ठेच मागचा शहाणा असं तत्व अवलंबलं तर होणार्‍या चुका टाळता येतील. पुढच्याचा आदर्श मनात बाळगून जीवन प्रवास सुखरूप, सुसह्य होत जाईल. मागे एकदा एका प्रवासात आमच्या बसचे हेडलाइट्स गेले. अंधार वाढत होता मग मागून आलेल्या एका बसने आपल्या पाठोपाठ येण्याचा सल्ला दिला. हे मार्गदर्शक तत्व तत्वज्ञानासारखं जीवनासाठीही लागू पडतं मनात अज्ञानाचा अंधकार असेल तर दुसर्‍याने दाखवलेल्या प्रकाशाच्या आधारे वाटचाल सोप्पी होऊन जाते. असं मार्गदर्शन आपल्याला गुरु देतात.  त्यांनी दाखवलेल्या मार्गाला अनुसरून केलेला प्रवास हा क्षेमकारक असेल. एकदा वाटेत अचानक टायर पंक्चर होऊन गाडी थांबली. पुढे मागे कित्येक मैल कसलेच दुकान नव्हते. पण, मदतीसाठी केलेला देवाचा धावा आणि याचना कामी आली देवासारखी एक गाडी मदतीला धावून आली, असा जीवनात कधीकधी साक्षात्कार घडतो.  

प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा असू शकतो. कुणाचा खाच खळगे असलेला कष्टप्रद असतो तर कुणाचा आरामदायक सुखकारक असू शकतो. कुणाच्या वाटेत दुखा:चे काटे अंथरलेले असतात तर कुणासाठी शाही मखमली गालिचे असतात. कधीकधी प्रवासात सुंदर मनमोहक असं दृश्य पाहायला मिळतं तर कधी एखादा भीषण प्रसंग तसे जीवनातही लहान मोठे अपघात पचवावे लागतात. पण तरीही वाट संपत नाही. ती पुढे पुढे घेऊन जातच असते. कधी धुक्याची दाट चादर असल्याने पुढचं काही दिसतच नाही तसं जीवनात अंधकार पसरतो तेव्हा प्रकाशाची एखादी तिरीप पुरेशी असते मनाला आधार देण्यासाठी. कधीकधी प्रवासात आपण जिवाची मुंबई करतो. मौजमजा, मनोरंजन यात रमतो. जीवनात असा काही काळ येतो जेव्हा आपण आयुष्य आनंदाने उपभोगतो.  प्रवास जर अथांग सागरातील असेल तर वादळाची शक्यता असते. तशी आयुष्यात येणारी वादळे ही आपली जीवन नौका दोलायमान करून जातात. ते आपल्या कसोटीचे क्षण असतात. प्रवासात जर सहप्रवासी चांगले मन मिळवू, मैत्रीपूर्ण असले तर प्रवास सुखकर होतो. जीवनात तुमच्याशी निगडीत व्यक्तींनी तुम्हाला जे सुख दुख दिलं त्यावर तुमचा प्रवास सुखी झाला की दुःखी हे ठरत असतं. उपभोगलेल्या सुखदुःखाचा नाजुक क्षणांचा आणि प्रवासातील आठवणींचा ग्राफ हा सारखाच असू शकेल.  

प्रवास करताना तुमची ध्येयासक्ती किती, कशी कणखर आहे किंवा किती साधी सौम्य आहे तसा तो प्रवास घडत जातो. एखाद्याला हिमाचलातील उत्तुंग शिखर गाठायचे असेल तर त्याचा प्रवास हा खडतर असतो. तिथले अनुभव किंवा प्रसंग हे वेगळी अनुभूति देणारे असतील तर सरळ राज मार्गाने आरामदायी सुखेनैव प्रवास करणारे यांचे अनुभव वेगळे असतील. प्रवासात अनेक तर्‍हेची माणसे भेटतात काही तात्पुरती क्षणिक असतात काहींशी कायमचे जोडले जातो. आयुष्यात भेटलेल्या माणसांचेही तसेच आहे. एखाद्या अनोळखी परदेशात तिथला गाईड आपल्याला माहिती देतो मार्गदर्शन करतो, तसं प्रत्येकवेळी आयुष्यातही असा कुणीतरी गाईड आपल्याला भेटत असतो, जो जगण्याचा मार्ग दाखवतो.  

प्रवास करताना वेगवेगळ्या रंगाचे, धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळ्या प्रदेशात राहणारे, कुणी सहकुटुंब, कुणी एकटे, कुणी खूप बोलणारे कुणी अबोल कुणी भांडणारे, कुणी मनमिळाऊ, मधेच येणारे विक्रेते, मध्येच भेटणारे भिकारी, चेकिंग करणारे अशा अनेकविध लोकांशी भेटून आपला प्रवास पार पडत असतो. हिरवळ, नद्या, शेती भाती, पूल घरे, बोगदा, पवनचक्की, डोंगर, धबधबे, पक्षी, प्राणी, सुंदर इंद्रधनुष्य, सूर्योदय, सूर्यास्त, पहाट, संध्या, दुपार, चंद्राचे शीतल दर्शन अशा अनेक देखाव्यांनी प्रवास समृद्ध होत असतो. जीवनाच्या वाटेवरून चालताना ही अशी काही सुखद काही मनोहारी चित्रे सामोरी येतात, त्यांचा आनंद घेत रमतगमत चालणं म्हणजे एक आनंदयात्रा. वळणावर थांबायचे आस्वाद घ्यायचा पुढे जात राहायचं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करत जगायचं, यालाच जीवन प्रवास म्हणता येईल.

(लेखिका साहित्यिक, गृहिणी आहेत.)