आनंदाची शेती

रंगीबेरंगी

Story: डॉ. प्राजक्ता कोळपकर 9881907241 |
24th January 2021, 12:24 pm
आनंदाची शेती

रस्त्याने जाताना बी- बियाणांची दुकानं शोधत होते मी. दुकान दिसलं आणि मी लगबगीने आत शिरले. "सुखाची, समाधानाची, आनंदाची शेती करावी म्हणते. बिया द्या न त्याच्या" असे विचारातच दुकानातल्या मालकापासून तर काम करणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत सगळेच गालातल्या गालात हसले. माझी सगळ्यांकडे चमत्कारिक नजर होती. मी म्हणाले, "आपल्याकडे मिळत नसल्यास आणखी कोणत्या दुकानात मिळेल? ते सांगितलं तरी चालेल". आता मात्र गालातल्या गालात हसणारे सारेच फिदीफिदी हसायला लागले. हसण्याची खदखद वाढायला लागली. हसण्याचा आवाज इतका वाढला की दुकानाबाहेरचे टपरीवाले, शेजारचा चप्पलवाला, भाजी विकणाऱ्या बायका  गोळा झाल्या आणि 'काय झाले?' हे खुणेने विचारताच दुकानातलला तो पोऱ्या मोठ्यानं हसून म्हणाला, "बाईंच्या डोक्यात फरक पडलाय. त्यांना आनंदाची, सुखाची, समाधानाची शेती करायचीय. त्याच्या बिया हव्यात त्यांना." आता माझ्यावर हसण्याची परिसीमा गाठली सगळ्यांनी. जो तो आणखी एका माणसाला ही बातमी सांगत होता आणि हसणाऱ्यांची आता रांग झाली होती. माझी नजर जाईल तिथपर्यंत माणसं हसताना दिसत होती. ती हसत होती म्हणजे आनंदी होती का? त्या हसण्यात खूप समाधान मिळत होतं का? आणि अशी खुश असतील तर समाधानाची शेती करायचीच कशाला? हे सगळे  प्रश्न मला पडले. मग वाटलं यांना इतका आनंद होत आहे  आणि माझ्या या त्यांना बाळबोध वाटणाऱ्या वाक्यावर इतकं हसायला येत आहे, तर मग मी शेती का करावी? असंच एखादं वाक्य फेकावं आणि लोकांना हसवावं. म्हणजे इतकं सोप्पं असतं तर असही मला वाटून गेलं....

अनेक विषय या लोकांसंबंधी डोक्यात थैमान घालत होते. मी त्या दुकानातून निघाले. वाटलं दुसऱ्या दुकानात जावे म्हणजे तिथल्याही शेकडो लोकांना हा प्रश्न विचारून मी हसण्याची संधी द्यावी. असा विचार करेपर्यंत लोकांचा घोळका माझ्या भोवती जमा झाला. म्हणजे कठडाच केला त्यांनी माझ्याभोवती... ते हसणं मला आता अंगावर आल्यासारखं वाटत होतं. मला त्याचा त्रास होत होता. मी काही बोलावं आणि त्यांना पटवून द्यावं हे शक्यच झालं नसतं; हे मला अगदी जाणवत होतं. माझाच आवाज मला येणार नाही इतकी आवाजाची बजबजपुरी दिसत होती. मी मला बजावत होते, नको बोलूस. अचानक कुणी तरी माझी ओढणी धरली आणि ती सावरेपर्यंत  कुठल्या तरी कोपऱ्यातून एक दगड माझ्यापर्यंत एका पोऱ्याने भिरकावला. तो मला माझ्या कपाळावर लागला आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. कुणीतरी मोठयाने ओरडलं, "बाईच्या डोक्यात फरक पडलाय, वेड लागलंय तिला". आता मात्र मला सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं. मी सैरभैर झाले होते. मी धावत सुटले. सगळी हसरी जनता माझ्या मागे धावत होती. कसाबसा मी जीव वाचवला माझा. अर्थात आतापर्यंत मनाने खंबीर असणारी मी आतल्याआत रक्तबंबाळ झाले होते. लोकांचा आनंद बघून मी हसावे की रडावे हेच मला कळत नव्हते. जर हाच इतका सोपा-साधा आनंदाचा मार्ग आहे तर शेतीची काय गरज? अशा अनेक प्रश्नांनी मला वेड्यात काढले.

रात्र झाली. अंधरूणावर पडले. आनंदाच्या शेतीचे खूळ डोक्यातून काही केल्या जात नव्हते. मी तडक उठले त्या सगळ्या हसणाऱ्या लोकांना जाऊन विचारायचे ठरवले, की तुमच्या आनंदाचं कारण काय? याने समधान मिळाले का? आणि यालाच सुख म्हणू का?" मी पायात चपला अडकवल्या. ओढणी कटाक्षाने काढून ठेवली. कुणाच्याही हाती ती लागू नये म्हणून. झपाझप चालायला लागले. त्या लोकांना शोधायचं कसं हा प्रश्न मला पडलाच नव्हता. सगळ्यांचे चेहरे मला लख्ख दिसत होते. स्लो मोशनमध्ये सगळे अक्राळविक्राळ लोकं नजरेसमोर येत होते. 

मी त्या बी-बियाणांच्या मालकाकडे गेले. अतिश्रीमंत आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या माणसाला मात्र रात्री शांत झोप लागली नव्हती. किती अस्वस्थ होता तो. चेहऱ्यावर चिंतेच्या किती आठ्या होत्या, न मोजता येणाऱ्या. त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या तिघांच्या घरी आईवडिलांची आजारपणं होती; न बरी होणारी... तो शेजारचा टपरीवाला त्याला मूल होत नाही म्हणून तो प्रचंड त्रस्त होता. खूप दवा-दारू करून झाली होती आणि आता तो दारूच्या नशेत धुत होता. ती म्हातारी भाजीवालीसुद्धा या म्हातारपणी मुलं तिला बघत नाहीत म्हणून विवंचनेत होती. तो चप्पलवाला चपला शिवत होता, मात्र आयुष्याची ठिगळं त्याला शिवता आली नाहीत. माझ्यामागे धावणाऱ्या प्रत्येकाला काही न काही विवंचना होत्या. मघाचे पोट धरधरून हसणे आता कुणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हते.

एकदम लख्ख प्रकाश पडला. कळलं, ही सगळी नाखूष, असमाधानी, दुःखी, पीडित लोकं आहेत. यांना धडधाकट दिलेलं आयुष्य आणि माणसाचा मिळालेला जन्म कशासाठी आहे? हेच कळलेलं नाही; हे लक्षात आलं...आणि माझ्या डोक्यात जो शेतीचा विचार होता तो पुन्हा जागा झाला.

मी दुसऱ्या दिवशी त्या दुकानात गेले. थेट दुकानाच्या मालकाला भेटले आणि सांगितले, "खरंच, मी आनंदाची, समाधानाची आणि सुखाची शेती करणार आहे; पण त्याचे बी बियाणे तुमच्याकडे नाहीच मुळी... पण कधी त्याचे बी बियाणे लागले तर सांगा, मी देईन. काय आहे न दुसऱ्याला देण्यात फार आनंद असतो.  दुसऱ्यासाठी रडता आलं पाहिजे, दुसऱ्याच्या आनंदात सामील होता आलं पाहिजे आणि समोरच्याच्या दुःखाचा भर हलका करता येतो का याचा विचार केला पाहिजे, असाही वेगळा विचार करता आला पाहिजे. कदाचित हे जमलं नाही तुम्हाला आणि जमणाही नाही; कारण तुमच्या कडे सुखाच्या, समाधानाच्या, आनंदाच्या बियाच नाही". असं म्हणून मी तिथून निघाले. तो मालक माझ्याकडे बघत असावा कदाचित.

मी गजरा घेत होते आणि त्याच दुकानाच्या शेजारी बसलेल्या जख्खड म्हातारीच्या पांढऱ्या फटक केसांवर  अबोलीचा लालसर केशरी गजरा माळत होते. त्या सुरकूतलेल्या आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यांतून पाझरत होता आणि सगळ्या चेहऱ्यावरचा वळ्या एकजात समधानाने हसत होत्या. त्या आजीने माझ्या गालावरून हात फिरवला माझी पापी घेतली. आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला. मी निघून गेले.

अर्ध्या तासात दारावरची बेल वाजली. तो बियाणांच्या दुकानाचा मालक दारात हात जोडून उभा होता. म्हणाला, "मलाही हव्यात सुखाच्या, समाधानाच्या बिया...ज्या मला आज तुमच्या हृदयात, मनात दिसल्या....जिला तुम्ही गजरा दिला ती माझी आई होती. तिला माझे स्टेटस जपण्यासाठी चार नोकर तिच्या दिमतीला मी ठेवले; पण ती कधीच खुश नसायची. मात्र तुमचा दहा रुपयांचा गजरा तिला आनंद देऊन गेला, जे मला कधीच उमगले नाही. अर्थात त्या बिया माझ्याकडे नाहीच; मग उमगणार कसे?

आज माझ्यासोबत आनंदाची, समाधानाची, सुखाची शेती करणारे खूप जण आहेत. फक्त या बिया पेरायच्या आणि उगवताना पहायच्या. सध्या ही चळवळ जोरात सुरू आहे.

लोकं मला हल्ली सधन शेतकरी म्हणतात!!

(लेखिका समाजसेवक, व्यावसायिक आहेत.)