सत्तरचे दशक म्हणजे हिंदी सिनेमांचा सुवर्णकाळ!

चित्रपट निर्माते राहुल रावल यांनी उलघडला मनोहरी प्रवास

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th January 2021, 12:35 am
सत्तरचे दशक म्हणजे हिंदी सिनेमांचा सुवर्णकाळ!

पणजी : १९७० च्या काळाने हिंदी चित्रपट क्षेत्रात नव्या कल्पना, नवे प्रयोग, नव्या जॉनरचे अॅक्शन चित्रपट अनुभवले. चाकोरीबाहेरच्या चित्रपटांचाही तो सुवर्णकाळ आणि नव्या तंत्राचाही उदयकाळ होता, अशी माहिती प्रसिद्ध चित्रपट निर्माते राहुल रावल यांनी दिली.
५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीच्या ‘इन कन्व्हरसेशन’ या ऑनलाईन सत्रात ‘५०, ६० आणि ७० या दशकांतील चित्रपट निर्मिती’ या विषयावर रावल बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील परिवर्तनाचा मनोहारी प्रवास प्रतिनिधींना घडवला.
१९६० च्या उत्तरार्धात आपण हिंदी चित्रपट उद्योगात काम करायला सुरुवात केली, या क्षेत्रातले दिग्गज राज कपूर यांचे सहाय्यक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केल्याचे रावल यांनी सांगितले. १९६० मध्ये के. असिफ आणि मेहमूद यांच्यासारख्या मान्यवरांनी भव्य सेटसह चित्रपटनिर्मिती केली. त्यानंतर ७० मध्ये चित्रीकरण स्थळी २५-३० दिवसांत चित्रीकरण करत बाबुराम इशारा यांच्या ‘चेतना’ने क्रांती घडवली. त्या काळात ही बाब असाधारण होती.
देव आनंद अभिनित ‘जॉनी मेरा नाम’ या विजय आनंद यांच्या चित्रपटाने अॅक्शनवर भर असलेल्या नव्या स्वरूपातल्या मोठ्या चित्रपटांचा उदय झाला. सत्तरच्या सुवर्णकाळात हिंदी चित्रसृष्टीची जोमाने वाढ होत असताना ‘जंजीर’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेला ‘चाकोरीबाहेरचा हिरो’ या जगताने पाहिला. यातून ‘एंग्री यंग मेन’ ही नवी संकल्पना उदयाला आली. १९७३ मध्ये आलेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटाने सलीम-जावेद यांनी आणलेले महान कथानक पाहिले. ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांना घेऊन राज कपूर यांनी केलेल्या ‘बॉबी ‘चित्रपटानेही नवा प्रवाह आणल्याचे रावल म्हणाले. जितेंद्र यांनीही नवी शैली, नवे अपिल हिंदी चित्रपटांत आणल्याचे त्यांनी सांगितले. दीवार या चित्रपटाने यश चोप्रा यांना शिखरावर नेले. यश चोप्रा यांनी त्यानंतर ‘त्रिशूल’सारखे अविस्मरणीय चित्रपट तयार केल्याचे ते म्हणाले.
त्या काळात चित्रपट तारे-तारका यांच्यात निकोप स्पर्धा असे. प्रत्येक अभिनेता एकापेक्षा एक वरचढ होता. मात्र, त्यांच्यात वैर नव्हते. राज कपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार हे तीन दिग्गज अभिनेते एका रेस्टॉरंटमध्ये भेटले असता जुन्या काळातील आणि परस्परांच्या चित्रपटांविषयी घनिष्ट मित्रांप्रमाणे त्यांनी गप्पा कशा रंगवल्या याचा किस्सा राहुल रावल यांनी सांगितला.

रावल यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे...
- प्रेक्षकही नव्या प्रकारचे सिनेमे अनुभवत होते. ८० मध्ये नवे लोक आले आणि आधीचे दिग्गजांनीही काम सुरूच ठेवले. याकाळात सुभाष घई, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह इतर दिग्गज आले.
- अर्जुन चित्रपट केला आणि कथानक नव्हे तर व्यक्तिरेखेचे प्राबल्य असलेल्या चित्रपटांचा जमाना आला. अर्जुनसाठी जावेद अख्तर यांनी सलग आठ तास कथानक लिहिले.
- खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमजद खान यांना विनोदी भूमिकेसाठी निवडले. या निर्णयाबाबत काहींनी शंका उपस्थित केली, मात्र महान कथानक नेहमीच चालते.