गुंतवणूकदारांसाठी इफ्फीची दारे खुली

मंत्री प्रकाश जावडेकर : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Story: पणजी । प्रतिनिधी |
17th January 2021, 12:38 am
गुंतवणूकदारांसाठी इफ्फीची दारे खुली

उद्घाटन सत्रातील रंगारंग कार्यक्रमात नृत्य सादर करताना गोव्यातील एक पथक. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : चित्रपट, कला व संस्कृतीच्या विकासासाठी चित्रपट उद्योजक आणि खासगी भागीदार यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) खुला केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर दिमाखात करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात मंत्री जावडेकर बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कन्नड अभिनेते सुदीप संजीव, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

यंदाचा महोत्सव करोनामुळे मर्यादित कार्यक्रमांनिशी साजरा होत आहे. मात्र, पुढील ५२ वा महोत्सव करोनावर मात करत मोठ्या धडाक्यात साजरा केला जाईल. यंदा इफ्फीसाठी ६०० विदेशी चित्रपट आले होते. त्यांतील १२६ दर्जेदार चित्रपटांची निवड समीक्षकांनी केली. यातील ५० सिनेमांचा प्रीमियर शो होणार आहे. भारतातील ‌१९० चित्रपटांची इफ्फीसाठी नोंद झाली होती. यातील २३ चित्रपट ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात असतील. सात चित्रपट थिएटरमधून प्रदर्शित होतील. यंदाचे बहुतेक चित्रपट ऑनलाईन पद्धतीनेच प्रसारित होतील, असेही मंत्री जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंत्री जावडेकर यांनी नवे दोन पुरस्कार देण्याची परंपरा सुरू होत असल्याची घोषणाही केली. यातील पहिला इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्कार तर दुसरा जीवनगौरव पुरस्कार जागतिक पातळीवरील चित्रपट जगताशी संबंधित मान्यवराला दिला जाईल. यानुसार यंदा जीवनगौरव पुरस्कार इटालियन सिनेमाटोग्राफर व्हिट्टोरिया स्टाेरारो यांना जाहीर झाला आहे. तर विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गोमंतकीय तरुणांना मार्गदर्शन करा! 

चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांनी गोमंतकीय तरुणांना या क्षेत्राविषयी मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. चित्रपट क्षेत्रातील उद्योजकांनी गोव्यात गुंतवणूक करावी. यात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी सरकार गुंतवणूक प्रक्रिया सुटसुटीत करण्यावर भर देत आहे. चित्रपट निर्मितीसाठी गोव्यात पोषक वातावरण आहे. म्हणून निर्मात्यांनी गोव्यात यावे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

चित्रपट हे सर्वांना जोडणारे माध्यम! 

चित्रपट हे सर्वांना जोडणारे, एकत्र आणणारे माध्यम आहे. सिनेमा हा एकाच जाग्यावर बसून संपूर्ण जगाची सहल घडवून आणतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कन्नड अभिनेते तथा निर्माते सुदीप संजीव यांनी केले आहे. या महोत्सवात त्यांनी भाषणाची सुरुवात कन्नडमधून केली. त्यांना चित्रपटसृष्टीत येऊन शनिवारीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. 

चटर्जी यांचा मार्चमध्ये गौरव 

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना ‘इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येईल, अशी माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मार्च २०२१ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल, असे ते म्हणाले. 

हेही वाचा