राजभवन ते गोमेकॉ व्हाया पणजी!

उपराष्ट्रपतींच्या मार्गावरून डीजीपी- सरकारमध्ये मतभेद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
16th January 2021, 12:33 am
राजभवन ते गोमेकॉ व्हाया पणजी!

पणजी : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सकाळी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात जाऊन आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर राजभवनावर परतताना उपराष्ट्रपतींना कोणत्या मार्गावरून न्यावे, या विषयावरून त्यांच्या सेवेतील अधिकारी आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) यांच्यात मतभेद उफाळून आले. शेवटी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप केल्यानंतर ते बांबोळीहून व्हाया गोवा विद्यापीठमार्गे राजभवनावर गेले. 

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष्य मंत्री नाईक यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी बांबोळी येथील गोमेकाॅत गेले होते. जाताना त्यांना राजभवनाहून बांबोळी व्हाया मिरामार, कांपाल, कंदब बसस्थानक, मेरशी जंक्शन या मार्गावरून नेण्यात आले. यावेळी पणजी शहरातील वाहतुकीला अडथळा आला. नागरिकांना काही काळ त्रास सहन करावा लागला. याची जाणीव उपराष्ट्रपतींच्या विशेष अधिकाऱ्यांना झाली. त्यामुळे परत राजभवनावर जाताना त्यांनी अन्य पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची म्हणजेत गोवा विद्यापीठमार्गे राजभवनावर जाण्याची व्यवस्था करण्याची सूचना पोलिस अधिकाऱ्यांना केली. मात्र, पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी त्यास नकार दिला.
उपराष्ट्रपती पूर्वीच्या आणि ज्या मार्गावरून गोमेकाॅत गेले, त्याच मार्गावरून त्यांना परत आणण्याचा त्यांनी हट्ट धरला. तसेच त्यांनी सुचविलेल्या मार्गाच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला. याच विषयावरून उपराष्ट्रपतींच्या सेवेतील अधिकारी आणि महासंचालक यांच्या मतभेद निर्माण झाले. याची माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना मिळताच त्यांनी हस्तक्षेप केला. त्यांनीही पणजी शहरातून न जाता गोवा विद्यापीठ मार्गावरून त्यांना नेण्याची सूचना केली.
यावेळी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरून काय चालवले आहे, ते कळलेच नाही. त्यामुळे त्यांची बरीच तारांबळ उडाली. त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना गोवा विद्यापीठ मार्गावरून नेण्यात आले.

मुख्यमंत्रीही संतापले
मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितल्यानंतरही पोलिस महासंचालकांनी शहरातूनच त्यांना नेण्याचा हट्ट धरला. यामुळे मुख्यमंत्री संतापले. तुम्हाला शक्य नसल्यास मी त्यांना गोवा विद्यापीठाच्या मार्गावरून घेऊ जातो, अशा इशाराच त्यांनी पोलिसांना दिला. त्यामुळे महासंचालकांनी नमते घेत तत्काळ तशी व्यवस्था केली. पणजी शहरातील मार्गावर तैनात केलेल्या पोलिसांना ऐनवेळी तत्काळ बसमधून बांबोळी ते राजभवन व्हाया गोवा विद्यापीठ मार्गावर तैनात करण्यात आले.

हेही वाचा