भंडारा प्रकरण : चौकशी समिती स्थापन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : दोषींची खैर नाही


10th January 2021, 11:27 pm

भंडारा : येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या दांम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आग प्रकरणी एक टीम चौकशी करीत असून मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी. एस. रहांगदळे यांना देखील यात सहभागी करून घेण्याचे निर्देश मी दिले आहेत.
हे दुःख भरून निघणारे नाही. मी सांत्वन करायला आलो आहे. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती बनविली आहे, यात मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुखही असतील. या समितीत सहा सदस्य राहतील, महिन्याभरात त्याचा अहवाल येईल, त्यानंतर आम्ही आवश्यक कारवाई करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दुर्घटना घडली त्याबद्दल कोणतेही शब्द माझ्याकडे नाहीत. हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. घटनास्थळ पाहिले पीडित कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन केले. काही उपकरणांबद्दल, यंत्रणेबद्दल काही मागण्या आल्या होत्या का, हे पाहावे लागेल. करोनासंदर्भात काम करताना आरोग्य यंत्राणेबद्दल काही दुर्लक्ष झाले आहे का, हे अहवालात समोर येईल, असेही ते म्हणाले.
राज्याच्या सर्व रुग्णालयाच्या फायर एन्ड सेफ्टी ऑडिटचे आदेश दिले आहेत, जरी ऑडिट झाले असले तरी पुन्हा करायला लावू, असेही ते म्हणाले. या घटनेवरून थेट राज्याच्या आरोग्याच्या स्थितीवर जाऊ नका. आम्ही राज्याची जबाबदारी घेतली आहे, असेही ते म्हणाले.