ज्येष्ठांनी देखभाल व कल्याण कायदाचा आधार घ्यावा

सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे यांचे आवाहन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th January 2021, 10:42 pm
ज्येष्ठांनी देखभाल व कल्याण कायदाचा आधार घ्यावा

म्हापसा: आसगाव येथे एक जेष्ठ नागरिक शंकर दयाळ शर्मा यांनी त्यांच्या मुलाला गीफ्ट डीडद्वारे दिलेले घर व दुकाने परत करण्याचा निवाडा येथील देखभाल लवादाने दिला आहे. लवादाने हा निवाडा गोवा पालक व ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायद्याच्या कलम २३ खाली दिला असून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हक्कासाठी या कायद्याचा आधार घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे यांनी केले आहे.
येथील हॉटेल सिरसाटमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत घाटे व ७७ वर्षीय फिर्यादी शंकर दयाळ शर्मा यांनी या निवाड्याची माहिती दिली. एका महिन्याच्या आत घर व दुकानाचा ताबा फिर्यादी शंकर शर्मा यांना देण्यासह त्यांना देखभाल खर्च म्हणून दर महिना १० हजार रुपय देण्याचा आदेश लवादाने दिला आहे. फिर्यादी वगळता इतर पक्ष लवादाच्या आदेशाला आव्हान देण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे या कायद्याचा आधार घेतल्यास ज्येष्ठ नागरिकांना हमखास न्याय मिळू शकेल, असा दावा घाटे यांनी केला आहे.
फिर्यादी शर्मा हे सराफी व्यावसायिक असून त्यांनी आपल्या कमाईतून आसगाव येथे जागा खरेदी करून तेथे घर बांधले होते. तसेच म्हापशात दोन दुकाने घेऊन तेथे सराफी व्यवसाय सुरू केला होता. शर्मा यांनी पत्नीच्या निधनानंतर गीफ्ट डीडच्या आधारे ही मालमत्ता आपल्या मुलाच्या नावावर केली होती. दुकान भाडे व देखभाल खर्च म्हणून दर महिना ५० हजार रुपये देण्याची हमी मुलाने दिली होती. याचे पालन करण्यास तो अयशस्वी ठरल्याने शर्मा यांनी लवादाकडे न्याय याचिका दाखल केली होती.