‘संजीवनी’ परिसरात ट्रायफूड पार्कच्या हालचाली

‘ट्रायफेड’कडून जागेची पाहणी; पंतप्रधान वन धन योजनेला मिळणार गती

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th January 2021, 10:37 pm
‘संजीवनी’ परिसरात ट्रायफूड पार्कच्या हालचाली

पणजी : संजीवनी सहकारी साखर कारखाना परिसरातील पाच एकर जमिनीत पंतप्रधान वन धन योजनेअंतर्गत ट्रायफूड पार्क उभारण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाच्या (ट्रायफेड) शिष्टमंडळाने गुरुवारी या जागेची पाहणीही केली आहे.
आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी गुरुवारी पर्वरी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. राज्यातील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यात पंतप्रधान वन धन योजनेला गती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. काहीच दिवसांपूर्वी दिल्लीत याबाबत त्यांनी आदिवासी मंत्रालयासोबत चर्चाही केली होती. त्यानुसार ‘ट्रायफेड’च्या शिष्टमंडळाने गोव्याला भेट देत वन धन योजनेच्या अनुषंगाने आपल्याशी चर्चा केली, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.
ट्रायफूड पार्क, ट्रायफेड शोरूम आणि वन धन केंद्र असे तीन प्रकल्प राज्यभरात उभारून आदिवासी समाजाच्या उत्पादनांना जागतिक मार्केट उपलब्ध करून देण्याची मागणी आपण ‘ट्रायफेड’च्या शिष्टमंडळाकडे केली. वन धन केंद्रामध्ये आदिवासी समाजातील ३०० सदस्यांचा समावेश असावा, अशी केंद्राची अट आहे. पण लोकसंख्येचा विचार करून गोव्याला या अटीमध्ये शिथिलता द्यावी आणि २०० ते २५० सदस्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी आपण ‘ट्रायफेड’कडे केली आहे. राज्यातील १५ स्वयंसहाय्य गटांना एकत्र आणून तसेच ६० टक्के आदिवासी समाजातील आणि ४० टक्के इतर समाजातील सदस्यांना घेऊन वन धन केंद्राची स्थापना करण्याचा प्रस्तावही आपण सादर केला आहे, असे गावडे म्हणाले.
राज्यातील आदिवासी समाज आपल्या शेतात पिकवत असलेल्या उत्पादनांपासून विविध खाद्यपदार्थ बनवून ते ट्रायफूड पार्कमध्ये विक्रीसाठी ठेवणे, अशा वस्तू तयार करण्यासाठी ट्रायफेड शोरूम उभारणे आणि केंद्र सरकारच्या मदतीने वन धन केंद्रांमार्फत त्यांचे मार्केटिंग, ब्रँडिंग तसेच कारागिरांना प्रशिक्षण देणे असे नियोजन राज्य सरकारने केले आहे. राज्यातील ज्या भागांत देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात त्या भागांत वन धन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी काणकोणमधून अशी केंद्रे उभारण्यास सुरुवातही झाली आहे. सध्या काणकोणात तीन स्वयंसहाय्य गट अशाप्रकारचे काम करीत आहेत, अशी मा​हितीही मंत्री गावडे यांनी दिली.
मंत्री गोविंद गावडे म्हणतात...
- पंतप्रधान वन धन योजनेअंतर्गत गोव्याला ५० ते ६० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ट्रायफूड पार्कसाठी सुमारे २० कोटींचा निधी अपेक्षित आहे. त्यापैकी ९५ टक्के निधी केंद्राकडून मिळणार असून, केवळ पाच टक्के निधी राज्य सरकार खर्च करणार आहे.
- योजनेअंतर्गत ट्रायफूड पार्क, ट्रायफेड शोरूम आणि वन धन केंद्र असे तीन प्रकल्प तयार झाल्यास राज्यातील आदिवासी समाजातील सुमारे ६०० जणांना तेथे प्रत्यक्ष, तर अनेकांना प्रत्यक्षरीत्या रोजगार प्राप्त होतील.
- वन धन केंद्रामार्फत गोव्यातील प्रसिद्ध काजू फेणीचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्याचा आणि काजू फेणी जगभरात पोहोचवण्यावर सरकार भर देणार आहे.