आठ दिवसांत नवा पालिका अध्यादेश!

मुख्यमंत्र्यांकडून व्यापाऱ्यांना हमी; सूचनांचा समावेश करण्याचीही ग्वाही

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th January 2021, 10:34 pm
आठ दिवसांत नवा पालिका अध्यादेश!

पणजी : व्यापाऱ्यांना मारक ठरणाऱ्या दुरुस्त्या वगळून आणि त्यांच्या सूचनांचा समावेश करून येत्या आठ दिवसांत नवा पालिका अध्यादेश जारी करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी व्यापारी संघटनांना दिली, अशी माहिती म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
नवा पालिका अध्यादेश पालिका क्षेत्रांतील व्यापाऱ्यांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे सरकारने तो तत्काळ रद्द करावा, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी विविध ठिकाणच्या व्यापारी संघटनांनी केली होती. त्यानंतर गुरुवारी या संघटनांच्या सुमारे ३० प्र​तिनिधींनी गुरुवारी पर्वरी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि पालिका अध्यादेशातील व्यापाऱ्यांना मारक ठरणाऱ्या दुरुस्त्या त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावेळी सर्वच व्यापारी संघटनांच्या सूचना लक्षात घेतल्या जातील. व्यापाऱ्यांचे हीत लक्षात घेऊन येत्या आठ दिवसांत नवा पालिका अध्यादेश जारी केला जाईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहे. मुख्यमंत्री आठ दिवसांत आम्हाला दिलेले आश्वासन पाळतील, असा विश्वासही शिरोडकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पालिका क्षेत्रांतील व्यापाऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या सोमवारी नवा पालिका अध्यादेश स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. पण सरकारने हा अध्यादेश रद्द करावा तसेच सर्वच व्यापारी संघटनांशी चर्चा करून आणि त्यांच्या सूचना मागवून नवा अध्यादेश जारी करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांच्या अध्यक्षांनी मंगळवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन केली. याशिवाय सोमवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना यासंदर्भात भेटलेली समितीच अस्तित्वात नसल्याची आणि मुख्यमंत्र्यांना भेटलेल्यांतील अनेकजण एका पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला होता. यातून अध्यादेशाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनांतील मतभेदही उघड झाले होते.
विमा सुविधा, प्रोत्साहन देण्याची मागणी
आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा मोहिमेअंतर्गत राज्यातील व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची तसेच व्यापाऱ्यांसाठी विमा सुविधा देण्याची मागणीही व्यापारी संघटनांच्या अध्यक्षांनी गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली. व्यापाऱ्यांच्या या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे, अशी माहिती आशिष शिरोडकर यांनी दिली.