जलस्रोत खात्यावरून मुख्यमंत्र्यांचा फॉरवर्डवर निशाणा!

ओएसडी चावडीकर यांच्या नेमणुकीबाबतही दिले स्पष्टीकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th January 2021, 07:57 am
जलस्रोत खात्यावरून मुख्यमंत्र्यांचा फॉरवर्डवर निशाणा!

पणजी : ओएसडी दयानंद चावडीकर यांच्या शिक्षण उपसंचालक (कायदा विभाग) पदावरील नेमणुकीवरून गोवा फॉरवर्डने केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले. पण त्यानंतर जलस्रोत खात्यावरून फॉरवर्डवर टीकास्रही सोडले.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपले ओएसडी दयानंद चावडीकर २००८ पासून सरकारच्या कायदेशीर बाबी हाताळतात. चावडीकर मुख्याध्यापक असून, त्यांच्याकडे कायद्याची पदवीही आहे. त्यामुळे त्यांची शिक्षण उपसंचालक (कायदा विभाग) या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना केवळ तसे पद देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची नेमणूक नियमबाह्य ठरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
चावडीकर यांच्यावरून आपल्यावर आरोप करणाऱ्या पक्षाने सरकारात असताना काय केले, याचा प्रथम विचार करावा. आपल्यावर आरोप करणाऱ्या पक्षाकडे काही वर्षांपूर्वी महत्त्वपूर्ण जलस्रोत खाते होते. पण खाते आणि तेथील अभियंत्यांकडे त्यांनी ढुंकूणही पाहिले नव्हते, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी प्रथम जलस्रोत खात्यातील अभियंत्यांना बढत्या मिळाल्या. त्यामुळे खात्याचे अभियंते अधिक गतीने काम करू लागले आहेत. इतकेच नव्हे तर आपण या खात्यामार्फत जागतिक बँकेकडून मिळणारा पाच कोटींचा निधीही आणला. स्वयंपूर्ण गोवा मोहिमेअंतर्गत तिलारी, साळावली कॅनल साफ करण्यासाठी जलस्रोत खात्याने ग्राम​विकास खात्याला अडीच कोटींचा निधी दिला. त्यानंतर ग्रामविकास खात्याने मनरेगा योजनेअंतर्गत नाले सफाईचे काम केले. यापूर्वी अशी कामे करण्यासाठी परप्रांतीय कंत्राटदारांची नेमणूक होत होती. संबंधित कंत्राटदार बाहेरील कामगार लावून अशी कामे करून घेत असे. पण आपल्या सरकारने हे काम मनरेगा योजनेत असलेल्या स्थानिक कामगारांकडून करून घेतले आणि त्यांना वेतनाच्या रुपात अडीच कोटी रुपये दिले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्यावर आरोप करण्यापूर्वी सरकारात असताना काय केले याचा विचार आरोप करणाऱ्यांनी पक्षांनी करावा, असा सल्लाही त्यांनी गोवा फॉरवर्डला दिला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी असलेल्या दयानंद चावडीकर यांची शिक्षण उपसंचालक (कायदा विभाग) या पदावर झालेली नेमणूक नियमबाह्य आहे. चावडीकर यांना देण्यात आलेली वेतनश्रेणी वैयक्तिक स्वरुपाची आहे. चावडीकर आपल्या जवळचे असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना या पदावर बसवले आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केला होता. हेच दुर्गादास कामत माजी जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांचे ओएसडी हाेते. तीच संधी साधून मुख्यमंत्र्यांनी जलस्रोत खात्याचा दाखला देत त्यांच्यावर टीकास्र सोडले.
स्वयंपूर्ण गोवा आता पालिका क्षेत्रांत
आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा मोहीम आता पालिका क्षेत्रांतही राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आपली विविध सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चाही सुरू आहे. लवकरच योजनेअंतर्गत नेमण्यात आलेले स्वयंपूर्ण मित्र पालिका क्षेत्रांत जाऊन योजनेला गती देण्याचे काम करतील, अशी माहितीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.