वेदांताच्या विस्तारास काँग्रेसचा विरोध

२४ रोजीची सार्वजनिक सुनावणी रद्द करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th January 2021, 07:52 am
वेदांताच्या विस्तारास काँग्रेसचा विरोध

डिचोली : आमोणा व न्हावेली येथील वेदांता कंपनीच्या प्रदूषणकारी प्रकल्पांमुळे आधीच गावांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आता येथील विविध प्रकल्पांचे विस्तारीकरण करण्यासाठी सर्व तयारी झाली आहे. त्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने २४ जानेवारीला सार्वजनिक सुनावणी निश्चित केली आहे. मात्र, या विस्ताराला आमचा पूर्णपणे विरोध असून सुनावणी रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
डिचोली येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते नीलकंठ गावस, माजी आमदार प्रताप गावस, प्रवीण ब्लेगन, खेमलो सावंत, सूर्यकांत गावडे, लक्ष्मीकांत परब, मंगलदास नाईक, बाबा देसाई व राजन देसाई आदी उपस्थित होते.
यापूर्वी प्रकल्पाची सार्वजनिक सुनावणी ही २८ मार्च २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोविडमुळे ती रद्द केली होती. आता २४ जानेवारी रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुनावणी कोणत्या आधारावर ठेवली? आपण कोविडमुक्त झालो आहोत का, असे प्रश्न नीळकंठ गावस यांनी उपस्थित केला. या सुनावणीस केवळ शंभर लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे, त्यांचीही नोंदणी आधी करावी लागणार आहे, ही कसली जनसुनावणी. सरकारने ब्रिटनमधील करोनाचा धोका वाढल्यानंतरही लाखो पर्यटकांना किनाऱ्यांवर येण्यास परवानगी दिली मग जनसुनावणीस बंधने का, असे प्रश्न माजी आमदार प्रताप गावस यांनी उपस्थित केले आहे.
जनसुनावणीला विरोध करण्यासाठी रविवार, १० जानेवारी रोजी न्हावेली येथील विविधा सभागृहात विशेष जागृती बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला संबंधित ३० गावांतील लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार प्रताप गावस, नीळकंठ गावस, प्रवीण ब्लेगन, खेमलो सावंत यांनी केले आहे.