अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २९ जानेवारीपासून

- दोन टप्प्यांत नियोजन : कामकाज समितीची शिफारस


06th January 2021, 12:09 am
अर्थसंकल्पीय अधिवेशन  येत्या २९ जानेवारीपासून

दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होईल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत असेल. मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) तशी शिफारस केली आहे.
काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. सध्या दिल्लीच्या सीमेवर या कृषी कायद्यांवरुन जोरदार आंदोलन सुरू आहे. या कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे, असे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले होते.
पहिला टप्पा २९ जानेवारीपासून सुरू होऊन १५ फेब्रुवारीपर्यंत चालेल व दुसरा टप्पा ८ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत असेल. तर, केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल. २९ जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. या अधिवेशन काळात करोनाशी निगडित सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन घेण्यात आले नाही. करोनाचा वाढता संसर्ग पाहता यावर्षी हिवाळी अधिवेशन घेतले जाणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याची संधी होती.
.......................................................................
करोनाच्या संकट काळात १४ सप्टेंबरपासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशन ८ दिवस आधीच संपवण्यात आले होते. २४ सप्टेंबरला पावसाळी अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. यावेळी कृषी कायद्यावरून झालेल्या गोंधळामुळे आठ खासदारांना अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. कृषी कायद्यावरुन काँग्रेसह विरोधी पक्षांची आंदोलन पुकारले होते. विशेष म्हणजे, कमी दिवसात विक्रमी काम या अधिवेशनात पार पडले होते.