नव्या विषाणूचा देशात आजवर ३८ जणांना संसर्ग

करोनाच्या नव्या विषाणूचा देशात आजवर ३८ लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. करोनाचा हा नवा विषाणू सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला होता, जो पूर्वीच्या करोना विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक संसर्गजन्य आहे.

Story: दिल्ली : |
04th January 2021, 11:24 pm
नव्या विषाणूचा देशात आजवर ३८ जणांना संसर्ग


दिल्ली : करोनाच्या नव्या विषाणूचा देशात आजवर ३८ लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. करोनाचा हा नवा विषाणू सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला होता, जो पूर्वीच्या करोना विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक संसर्गजन्य आहे.

आयसीएमआरने शनिवारी म्हटले होते की, ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोना विषाणूच्या नव्या प्रकाराचे भारताने यशस्वीरीत्या ‘कल्चर’ केले आहे. ‘कल्चर’ ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पेशी नियंत्रित परिस्थितीत तयार केल्या जातात. विशेषतः त्यांच्या नैसर्गिक वातावरणाबाहेर ही प्रक्रिया केली जाते. ब्रिटनमध्ये समोर आलेल्या विषाणूच्या नव्या प्रकाराला पुण्यातील एनआयव्ही येथे सर्व स्वरुपात यशस्वीरीत्या पृथक आणि कल्चर करण्यात आले आहे. यासाठी ब्रिटनहून भारतात आलेल्या लोकांचे नमुने एकत्रित करण्यात आले होते.

नव्या बाधितांच्या संख्येत घसरण

कोविड मुक्तीसाठी नियोजनबद्ध वाटचाल केल्याने भारतात रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या बाधितांच्या संख्येतील घसरण कायम राहिली आहे. गेल्या २४ तासांत देशपातळीवरील कोविड बाधितांच्या संख्येत १६,५०४ जणांची वाढ झाली; तर सक्रिय कोविडग्रस्तांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्या लक्षात घेता देशात फक्त २.३६ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत एकूण बाधितांची संख्या ३,२६७ने कमी झाली आहे.