कृषी कायद्यांशी देणेघेणे नाही!

- ‘रिलायन्स’कडून अधिकृत पत्र जारी

Story: दिल्ली : |
04th January 2021, 11:22 pm
कृषी कायद्यांशी देणेघेणे नाही!

दिल्ली : नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील पाच आठवड्यांहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी सध्याचे नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून यामधून मोठ्या कंपन्यांचा फायदा होणार आहे असा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रिलायन्सने एक अधिकृत पत्र जारी केले आहे. आमचे या कृषी कायद्यांशी काहीही देणेघेणे नाही, असे त्यातून स्पष्ट करण्यात आले आहे.

पत्रात म्हटलेय की, कंपनीने यापूर्वी व्यवसायिक पद्धतीची शेती केलेली नाही. तसेच भविष्यातही या क्षेत्रात उतरण्याचा कंपनीचा कोणताही विचार नाही. रिटेल उद्योगामध्ये भारतात रिलायन्स रिटेल या कंपनीच्या तोडीस तोड अशी कोणताही कंपनी नाही. कंपनीच्या मालकीच्या वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या अन्नधान्य, डाळी, फळे, भाज्या, दैनंदिन वापरातील वस्तू, कपडे, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मिती आणि पुरवठा हे वेगवेगळ्या कंपन्या करतात.

कंपनी म्हणते...

* रिलायन्स रिटेल कंपनी कोणत्याही शेतकऱ्यांकडून थेट पद्धतीने माल विकत घेत नाही. तसेच निर्धारित किमतीपेक्षा शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत माल विकत घेण्याचा प्रयत्न कंपनीने कधीही केलेला नाही आणि भविष्यातही असा प्रयत्न कंपनीकडून कधीच केला जाणार नाही.

* १३० कोटी भारतीयांचे अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला म्हणजेच रिलायन्सचा प्रचंड अभिमान आहे. शेतकऱ्यांचे भले व्हावे, त्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी जे जे काही शक्य आहे ते करण्यासाठी रिलायन्स आणि समुहाशी संबंधित सर्व कंपन्या बांधील आहेत.

* आम्ही शेतकऱ्यांचे ग्राहक असल्याने आम्ही त्यांच्याशी दोघांनाही नफा होईल अशापद्धतीचे तसेच समान हिस्सेदारीवर आधारित भागीदारी करू इच्छितो. यामधून सर्वसमावेशक विकास आणि समता असणारा नवीन भारत निर्माण करण्याची आमची इच्छा आहे.