चर्चेची सातवी फेरीही​ निष्फळ

- शेतकरी, सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम; ८ रोजी पुन्हा बैठक


04th January 2021, 11:21 pm
चर्चेची सातवी फेरीही​ निष्फळ

दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाच आठवड्यांपेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. सोमवारी सरकार व शेतकरी संघटना यांच्यात पार पडलेल्या बैठकीत देखील कुठलाही तोडगा न निघाल्याने चर्चेची सातवी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान, ८ जानेवारीला सरकारसोबत पुन्हा एकदा बैठक होणार आहे.
‘आम्ही स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत कायदे रद्द केले जात नाही, तोपर्यंत घरवापसी करणार नाही’, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारसोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
झालेल्या चर्चेत शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना कृषी कायदे रद्द करणार की नाही? असा प्रश्न केला. त्यावर केंद्र सरकार कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास तयार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. चर्चा याच मुद्द्यावर अडकल्याने जेवणासाठी बैठक थांबवण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही तोडगा निघाला नाही.