दुसऱ्या दिवशीही शेतकरी आंदोलन

सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांची रात्रभर उपस्थिती

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th January 2021, 12:51 am

आंदोलनस्थळीच शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करताना महिला. (संदीप मापारी)

सांगे : शेतकरी संघर्ष समितीने शनिवारपासून शेतकरी आंदोलन सुरू केले असून रविवारी दुसऱ्या या आंदोलनात चारशेहून अधिक ऊस उत्पादकांनी हजेरी लावली. शनिवारी सकाळपासून हे आंदोलन सुरू झाल्यानंतर स्थानिक आमदार प्रसाद गावकर हेही त्यात सहभागी झाली. विशेष म्हणजे, रात्रीते दीडशे आंदोलकांसह आंदोलनस्थळीच जमिनीवर झोपले.
सरकारने शेतक‍‍ऱ्यांना पोकळ आश्वासनांशिवाय काहीही दिलेले नाही. सरकारने आज शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्यास भाग पाडले असून, त्यांच्यावर जमिनीवर झोपण्याची वेळ आणली आहे. हे शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी भांडीकुंडी घेऊन, सिलिंडर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. घरदार सोडून तिथेच जेवण करत आहेत, अशी टीका यावेळी आंदोलकांनी केली. हे आंदोलन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना तोडणीचे ६०० रुपये देण्यासाठी सरकारने वाडे कुर्डी येथे मंगळवारी धनादेश वितरण कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत धनादेश घेणार नाही, असा पवित्रा रविवारी शेकऱ्यांनी घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व किसान मोर्चाचे अध्यक्ष अभिजीत देसाई यांनी पाठिंबा दिला. शेतकाऱ्यांक हक्काचे पैसे देण्यास सरकार चालढकलपणा करत असेल तर, शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न यावेळी आमोणकर यांनी उपस्थित केला. कॅसिनोसारख्यांच्या मागण्या सरकार एका रात्रीत मान्य करते. मात्र, ज्यांच्यावर सगळे अवलंबून आहेत, त्यांच्यावर अन्याय करते. सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, असेही आमोणकर यावेळी म्हणाले. ऊस उत्पादकांच्या सर्व मागण्यांना काँग्रेसचा पाठिंबा राहील, असे आश्वासन देसाई यांनी दिले.
सरकारने झोपेचे सोंग सोडावे!
सरकारच्या बेजबाबदारपणामुळे आज शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. सरकार ऊस उत्पादकांशी राजकारण खेळत आहे. झोपेचे सोंग सोडून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. तसे त्यांना लेखी द्यावे. त्याच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मी त्यांच्या सोबत राहीन, असे आमदार प्रसाद गावकर यांनी म्हटले आहे.
...तोपर्यंत धनादेश स्वीकारणार नाही!
सरकारने आंदोलकांना शांत करण्यासाठी मंगळवार, ५ जानेवारी रोजी कापणीचा धनादेश वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचे जोपर्यंत लिखित स्वरूपात मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवले जाईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष कुष्टा गावकर यांनी दिला आहे.