पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

भेदक मार्‍यासमोर भारतीय फलंदाज ढेपाळले : कोहलीची एकाकी झुंज : भारत ६ बाद २३३


17th December 2020, 11:36 pm
पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

फोटो : पृथ्वी शॉला त्रिफळाचित केल्यानंतर मिचेल स्टार्कचे अभिनंदन करताना खेळाडू.

अ‍ॅडलेड : कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवसअखेर ८९ षटकांत ६ बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली. वृद्धिमान साहा (९) आणि आर. अश्विन (१५) खेळत आहेत. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा (४३) आणि अजिंक्य रहाणे (४२) यांना चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर पृथ्वी शॉच्या अपयशाची मालिका सुरूच असून स्टार्कच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचित होऊन शून्यावर माघारी परतला. त्यानंतर मयांक अग्रवालही (१७) फार काळ मैदानात टिकला नाही. लागोपाठ दोन झटके बसल्यानंतर अनुभवी पुजारा आणि विराट कोहली यांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. मात्र, नॅथन लॉयन याने पुजाराला बाद करत ही जोडी फोडली. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसर्‍या गड्यासाठी ६८ धावांची भागिदारी केली.

पुजारा बाद झाल्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेसोबत कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विराट कोहली चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. कोहलीने ७४ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार लगावले. कोहली बाद झाल्यानंतर पाठोपाठ रहाणेही तंबूत परतला. त्यानंतर हनुमा विहारीने (१६) आपली विकेट फेकली. पहिल्या दिवशी सामन्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजचे वर्चस्व दिसून आले. स्टार्क, हेजलवूड, कमिन्स आणि लॉयन यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. कांगारूंच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघातील फलंदाजांनी नांग्या टाकल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने दोन बळी घेतले तर हेजलवूड, कमिन्स आणि लॉयन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

धोनीचा विक्रम मोडला

चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराटने अजिंक्य रहाणेच्या साथीने संघाचा डाव सावरत अर्धशतक झळकवले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे २३वे अर्धशतक ठरले. या खेळीदरम्यान विराटने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीय कर्णधारांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. त्याने धोनीचा ८१३ धावांचा विक्रम मोडला.

पुजारा दहाव्यांदा लॉयनची शिकार

चिवट फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला चेतेश्वर पुजारा ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लॉयनचा शिकार ठरत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात नॅथन लॉयन याने पुजाराला ४३ धावांवर बाद केले. लॉयनची पुजाराला बाद करण्याची ही दहावी वेळ होती. आतापर्यंत पुजाराला लॉयनने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. नॅथन लॉयननंतर अँडरसन याने सात वेळा, ब्रॉड, हेजलवूड, स्टोक्स आणि बोल्ट यांनी प्रत्येकी चार वेळा पुजाराला बाद केले आहे.

पृथ्वीबाबतचे पाँटींगचे बोल खरे

सराव सामन्यात अपयशी ठरलेला सलामिवीर पृथ्वी शॉ मिचेल स्टार्कच्या दुसर्‍याच चेंडूवर क्लीन बोल्ड होऊन माघारी परतला. सामना सुरू होण्यापूर्वी सुनील गावस्कर यांच्यासोबत समालोचन करताना रिकी पाँटींग म्हणाला होता की, शरीराजवळ न येणारा चेंडू पृथ्वी शॉची कमकुवत बाजू आहे. पॅड आणि बॅटमध्ये खूप अंतर असते, ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. पाँटींगने पृथ्वीबद्दलची दुखरी नस सांगितल्यानंतर लगेच पृथ्वी शॉ तसाच बाद झाला. पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधीत्व करतो. या संघाचा प्रमुख कोच रिकी पाँटींग आहे. सहाजिकच पाँटींगला पृथ्वीबद्दलच्या कमकुवत बाजू माहीत आहेत.

...आणि विराट पुन्हा तसाच धावबाद

सामन्यातील ७७व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने चेंडू समोर मारला. एक धाव घेण्याच्या उद्देशाने त्याने विराटला इशारा केला. नंतर पुन्हा नकार दिला. तोपर्यंत विराट निम्म्यापर्यंत आला होता. ऑस्ट्रलियन खेळाडूंनी चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला आणि विराट धावबाद झाला. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये २०१२ साली अ‍ॅडलेडच्या मैदानावर विराट अशाच पद्धतीने धावबाद झाला होता. विराटला बाद करण्यासाठी कर्णधार टीम पेनने अनेक प्रयत्न केले, परंतु गोलंदाजांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अखेरीस भारतीय फलंदाजांमधील गोंधळामुळे ऑस्ट्रेलियाला विराटची विकेट मिळाली.

शेन वॉर्नची पुजाराबाबत आक्षेपार्ह टिप्पणी

सामन्यादरम्यान इंग्रजी समालोचन करणार्‍या शेन वार्नने चेतेश्वर पुजाराबाबत वापरलेल्या ‘स्टिव्ह’ शब्दामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. हे नाव वर्णद्वेषी असल्याचा ठपका चाहत्यांनी ठेवला आहे. वॉर्नने याबाबत माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. गेल्याच महिन्यात क्रिकेटपटू अझीम रफीक याने यॉर्कशायर क्लबमध्ये भेदभाव होत असल्याचा दावा केला होता. कृष्णवर्णीय खेळाडूला यॉर्कशायर क्लबचे अन्य खेळाडू स्टीव्ह म्हणून बोलवायचे. पुजाराने हा क्लब जॉईन केला, तेव्हा त्यालाही याच नावाने बोलावले गेले. कारण त्याचे नाव त्यांना उच्चारण्यास कठीण जात होते. हाच धागा पकडून नेटकर्‍यांनी वॉर्न यांचा निषेध केला आहे.