जमशेदपूरला नमवण्यासाठी नॉर्थईस्ट युनायडेट आतूर

जमशेदपूरला मध्य फळीतील निलंबित ऐतोर मॉनरॉय याची जाणवेल उणीव


17th December 2020, 11:33 pm
जमशेदपूरला नमवण्यासाठी नॉर्थईस्ट युनायडेट आतूर

पणजी : सातव्या इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होत आहे. मोसमाला तुफानी सुरुवात केल्यानंतर अपराजित मालिका कायम राखण्यास नॉर्थईस्ट सज्ज झाला आहे. नॉर्थईस्टने विजय मिळवल्यास आघाडीवरील मुंबई सिटी एफसी तसेच दुसर्‍या क्रमांकावरील एटीके मोहन बागान यांना गुणांवर गाठणे त्यांना शक्य होईल. जमशेदपूरविरुद्ध पराभव टाळल्यास गुवाहाटीस्थित संघ आयएसएल इतिहासातील सर्वोत्तम अपराजित मालिका नोंदवेल. 

जमशेदपूरचा स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीस याच्या खेळाबाबत नॉर्थईस्टला दक्ष राहावे लागेल. एफसी गोवा संघाच्या इगोर अँग्युलो याच्यासह तो सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत संयुक्त आघाडीवर आहे. आघाडी फळीत लिथूएनियाच्या या गुणवान खेळाडूवर जमशेदपूरची मदार आहे. त्याने जमशेदपूरचे सातपैकी सहा गोल नोंदवले आहेत. जमशेदपूरला आधीच्या दोन सामन्यांत बरोबरी पत्करावी लागली आहे. त्यामुळे विजय मिळाल्यास सातव्या क्रमांकावरील हा संघ पहिल्या चार क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा उंचावेल. जमशेदपूरला मध्य फळीतील निलंबित ऐतोर मॉनरॉय याची उणीव जाणवेल. नॉर्थईस्टच्या आघाडी फळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टीफन इझे आणि पीटर हार्टली या बचाव फळीतील जोडीला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. जमशेदपूरचे प्रशिक्षक कॉयल म्हणाले, आम्हाला नॉर्थईस्टच्या क्षमतेविषयी प्रचंड आदर आहे; परंतु सर्वोत्तम कामगिरी केल्यास आम्ही जिंकू शकतो, असा विश्वास वाटतो.

पराभूत व्हायचे नाही अशा निर्धाराने आम्ही कसून सराव करत आहोत. प्रत्येक सामन्यांत तीन गुण वसूल करण्याचा आमचा प्रयत्न असतो, पण मला पराभवाची भीती वाटत नाही. आम्ही प्रगती करत राहणे महत्त्वाचे आहे.

- जेरार्ड न्यूस, प्रशिक्षक, नॉर्थईस्ट