ओदिशाला हरवून बेंगळुरूची आगेकूच

सुनील छेत्रीचा वैयक्तिक पन्नासावा गोल : बेंगळुरूची तिसर्‍या स्थानावर उडी


17th December 2020, 11:31 pm
ओदिशाला हरवून बेंगळुरूची आगेकूच

फोटो : बरोबरीचा गोल साधल्यानंतर आनंद व्यक्त करताना ओदिशाचा कर्णधार स्टीव्हन टेलर.

पणजी ः इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने ओदिशा एफसीवर २-१ अशी मात करून आगेकूच केली. कर्णधार सुनील छेत्रीचा आयएसएलमधील वैयक्तिक पन्नासावा गोल विजयाचे वैशिष्ट्य ठरला. ब्राझीलचा मध्यरक्षक क्लेईटन सिल्वा याने बेंगळुरूचा दुसरा गोल करत विजय निश्चित केला. बेंगळुरू अपराजित असून हा त्यांचा सलग दुसरा विजय आहे. आयएसएलमध्ये पन्नासावा गोल करणारा सुनील छेत्री हा पहिलाच भारतीय फुटबॉलपटू ठरला. त्याच्या गोलमुळे बेंगळुरूने मध्यंतरास १-० अशी आघाडी घेतली होती. ओदिशाने कर्णधार स्टीव्हन टेलरच्या गोलमुळे दुसर्‍या सत्रात बरोबरी साधली, पण सिल्वाने बेंगळुरुचे तीन गुण नक्की केले.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. खाते उघडण्याची शर्यत बेंगळुरूने जिंकली. मध्य फळीतील डिमास डेल्गाडोने आपल्या क्षेत्रातून ओदिशाच्या क्षेत्रात चेंडू मारला. उजव्या बाजूला मध्य फळीतील खेळाडू हरमनज्योत खाब्रा याने चेंडूवर ताबा मिळवला. त्याने गोलक्षेत्रात मारलेल्या चेंडूवर छेत्रीने चपळाईने तसेच ताकद लावून हेडिंग केले. ओदिशाचा बचावपटू शुभम सारंगी तेव्हा जवळच होता, पण छेत्रीने कौशल्याने उडी घेत हेडिंगवर लक्ष्य साधले. त्याने नेटच्या उजव्या कोपर्‍यात मारलेला चेंडू ओदिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला अडवता आला नाही.

७१व्या मिनिटाला ओदिशाने बरोबरी साधली. मध्यरक्षक जेरी माहमिंगथांगा याने रचलेल्या चालीवर बचाव फळीतील इंग्लंडचा खेळाडू स्टीव्हन टेलर याने बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला चकवले. त्यानंतर आठ मिनिटांत बेंगळुरूने आघाडी घेतली. आघाडी फळीतील बदली खेळाडू देशोर्न ब्राऊन याच्या पासवर सिल्वा याने लक्ष्य साधले.

बेंगळुरूची सुरुवात सकारात्मक होती. पहिल्याच मिनिटाला त्यांनी कॉर्नर मिळवला. डेल्गाडोने गोलक्षेत्रात मारलेला चेंडू अर्शदीपने पुढे सरसावत हाताने थोपवला. दुसर्‍या मिनिटाला थ्रो-इनवर खाब्राने गोलक्षेत्रात मारलेला चेंडू मध्यरक्षक एरिक पार्टालू याने मागे मारला. त्यावर ताबा मिळवत जुआनन याने चेंडू पुन्हा पार्टालूकडे सोपवला. पार्टालूने मारलेला चेंडू ओदिशाचा बचावपटू जेकब ट्रॅट याला लागून क्रिस्तीयन ओप्सेथ याच्या दिशेने गेला. बेंगळुरूचा स्ट्रायकर ओप्सेथ चेंडू ताब्यात घेण्यासाठी व्यवस्थित संतुलन साधू शकला नाही. चेंडू त्याच्या बूटाला लागून नेटपासून लांब गेला.

बेंगळुरू गुणतक्त्यात तिसर्‍या स्थानी

बेंगळुरूचा हा सहा सामन्यांतील तिसरा विजय असून तीन बरोबरींसह त्यांचे १२ गुण झाले. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला (६ सामन्यांतून १०) मागे टाकत गुणतक्त्यात एक क्रमांक प्रगती करत चौथ्यावरून तिसरे स्थान गाठले. आतापर्यंत बेंगळुरू, नॉर्थईस्ट आणि हैदराबाद हे तीनच संघ अपराजित आहेत. ओदिशाला सहा सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला. एकमेव बरोबरीसह एकच गुण व ११ संघांमध्ये त्यांचे दहावे स्थान कायम राहिले. मुंबई सिटी आणि एटीके मोहन बागान यांचे प्रत्येकी १३ गुण आहेत. यात मुंबई सिटीचा ६ (९-३) गोलफरक एटीकेएमबीच्या ४ (७-३) पेक्षा सरस आहे. यामुळे मुंबई सिटी आघाडीवर आहे.