सिक्की रेड्डीला करोना; पी.व्ही. सिंधूलाही धोका

गोपीचंद यांचा बॅडमिंटन कॅम्प बंद


16th December 2020, 10:24 pm
सिक्की रेड्डीला करोना; पी.व्ही. सिंधूलाही धोका

फोटो : सिक्की रेड्डी

हैदराबाद : गेल्याच आठवड्यात भारतीय हॉकी संघातील ६ खेळाडूंना करोना झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचे फिल्डिंग कोच यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता हैदराबाद येथे सुरू असलेल्या नॅशनल बॅडमिंटन कँपमध्ये सहभागी होण्यास आलेल्या एन. सिक्की रेड्डीला करोना विषाणूची लागण झाली आहे. सिक्कीच्या फिजिओथेरेपिस्ट किरण जॉर्ज यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये करोनाचे कोणतेही लक्षण दिसले नव्हते. तरी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

एन. सिक्की रेड्डी आणि किरण जॉर्ज यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या पी.व्ही. सिंधूला करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. सिक्की आणि किरण यांचे रिपोर्ट आल्यानंतर बॅडमिंटन कॅम्प भारतीय क्रीडा प्राधिकरणाने बंद केला आहे. हा कॅम्प पुलेला गोपीचंद यांची बॅडमिंटन अकादमी घेत आहे. आता या अकादमीला सॅनिटायझेशन करून बंद करण्यात आले आहे.

कॅम्पमधील सर्वांची करोना चाचणी : गोपीचंद

भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साईने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. दोघीही हैदराबादच्या आहेत आणि घरातून थेट कॅम्पमध्ये आल्या होत्या. या दोघी कोणाच्या संपर्कात आल्या होत्या याची माहिती घेतली जात आहे. कॅम्पमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाड, प्रशिक्षक, स्टाफ आणि अधिकारी यांची करोना चाचणी घेण्यात आली होती. यांपैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, असे गोपीचंद म्हणाले.