ओदिशासमोर बेंगळुरूचे आव्हान

आयएसएल स्पर्धेत आज बांबोळीत सामना


16th December 2020, 10:23 pm
ओदिशासमोर बेंगळुरूचे आव्हान

पणजी : सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर ओदिशा एफसीसमोर बेंगळुरू एफसीचे आव्हान असेल.

ओदिशा घसरण रोखण्यासाठी झगडत आहे, तर बेंगळुरूने उसळी घेत पुनरागमन केले आहे. ओदिशाच्या कामगिरीचे आकडे फारसे प्रभावी नाहीत. पाच सामन्यांतून त्यांना एकच गुण मिळवता आला आहे. सहभागी संघांमध्ये सर्वांत कमी गोल संयुक्तरीत्या त्यांचे आहेत. ओदिशा आणि ईस्ट बंगाल यांना प्रत्येकी दोनच गोल करता आले आहेत. ओदिशाचे दोन्ही गोल जमशेदपूरविरुद्ध झाले. तेव्हा जमशेदपूरला दहाच खेळाडूंसह खेळावे लागले होते. अशावेळी अद्याप अपराजित असलेल्या माजी विजेत्या बेंगळुरूचे ओदिशासमोर कडवे आव्हान राहील.

स्टुअर्ट बॅक्सटर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या संघाला सामन्यामागे केवळ २.४ शॉट मारता आले आहेत. आपल्या संघाने आणखी आक्रमक पद्धतीचा खेळ करण्याची गरज असल्याचा मुद्दा इंग्लंडच्या बॅक्सटर यांनी ठसवला. ते म्हणाले की, आम्हाला आक्रमणात सरस कामगिरी करावी लागेल. आम्ही लय मिळवू शकलो आणि प्रतिस्पर्ध्याची लय विस्कळीत करू शकलो तर ते आमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

बेंगळुरूने सेट-पिसेसवर केलेल्या गोलची संख्या लक्षणीय आहे. यात थ्रो-ईनवरील तीन गोलांचा समावेश आहे. त्यामुळे याबाबतीत ओदिशाच्या ढिसाळ खेळाचा फायदा उठवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. केरला ब्लास्टर्सवरील दणदणीत विजयामुळे त्यांचे मनोधैर्यही उंचावले आहे. त्या सामन्यात क्लेईटन सिल्वा आणि सुनील छेत्री अशा प्रमुख खेळाडूंनी गोल केले. ब्लास्टर्सविरुद्धची कामगिरी खेळाडू पुढे कायम ठेवतील, अशी बेंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांची अपेक्षा असेल.

आमचे खेळाडू फाजील आत्मविश्वास बाळगत नाहीत. ते चुरशीने खेळतात. आयएसएलमध्ये आम्ही कधीही गाफील राहिलो नाही, कारण कोणताही संघ कोणत्याही संघाला हरवू शकतो याची आम्हाला जाणीव आहे. ओदिशासारखे संघ नक्कीच फार धोकादायक असतात. आम्ही सर्व त्याबाबतीत दक्ष असतो.

- कार्लेस कुआद्रात, प्रशिक्षक, बेंगळुरू