एटीके मोहन बागान विजयी

बलाढ्य एफसी गोवा संघावर १-० अशी मात


16th December 2020, 10:22 pm
एटीके मोहन बागान विजयी

फोटो : एटीके मोहन बगानची फ्री कीक अडवण्याचा प्रयत्न करताना एफसी गोवाचे खेळाडू.

पणजी ः इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात बुधवारी तुल्यबळ संघांमधील लढतीत एटीके मोहन बागानने एफसी गोवा संघाला १-० असा यशस्वी शह दिला. पाच मिनिटे बाकी असताना फिजीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू रॉय कृष्णा याने पेनल्टीवर केलेला गोल निर्णायक ठरला. आक्रमक खेळ करणार्‍या गोव्याला अखेरपर्यंत फिनिशींग करता आले नाही. 

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती.  ८४व्या मिनिटाला गोव्याचा बदली बचावपटू ऐबन डोहलिंग याने कृष्णाला गोलक्षेत्रात पाडले. त्यामुळे रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी एटीकेएमबीला पेनल्टी बहाल केली. ती घेण्यासाठी कृष्णा पुढे आला. त्याने गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याला यशस्वीरीत्या चकवले. कृष्णाचा हा सहा सामन्यांतील पाचवा गोल आहे. संघाच्या सात गोलांमध्ये त्याचा वाटा सिंहाचा आहे.

दुसर्‍याच मिनिटाला एटीकेएमबीला थ्रो-इन मिळाला. बचावपटू प्रीतम कोटलने गोलक्षेत्रात टाकलेला चेंडू सहकारी स्ट्रायकर मानवीर सिंगने हेडिंगद्वारे मागील बाजूस असलेल्या रॉय कृष्णाकडे मारला. त्याचवेळी गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ पुढे सरसावला. कृष्णाचा धोका कायम असल्यामुळे गोव्याचा बचावपटू जेम्स डोनाची याने चपळाईने चेंडूवर ताबा मिळवला.

सहाव्या मिनिटाला डोनाची याने कृष्णाला पाडले. त्यामुळे एटीकेएमबीला फ्री किक मिळाली. बचावपटू प्रीतम कोटल याने गोलक्षेत्रात मारलेला चेंडू डोनाचीने हेडिंगद्वारे रोखला.

सामन्यातील पहिला कॉर्नर गोव्याला १४व्या मिनिटाला मिळाला. बेदियाने मारलेला चेंडू मानवीरने बाहेर घालवला. त्यामुळे पुन्हा कॉर्नर देण्यात आला. त्यावेळी बेदियाने मारलेला चेंडू टिरीने हेडिंगकरवी थोपवला. त्यातून सेव्हियर गामाला संधी मिळाली, पण त्याने अत्यंत स्वैर फटका मारला.

५२व्या मिनिटाला नवाझच्या ढिलाईमुळे चेंडू मिळताच हल्दरने प्रयत्न केला, पण चेंडू नेटवरून बाहेर गेला. त्यानंतर ५४व्या मिनिटाला विल्यम्सची चाल फोल ठरली. अखेरच्या क्षणी सेव्हियर गामा याने गोव्यासाठी केलेला दमदार प्रयत्न एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याने रोखला.

एटीकेएमबीचे सहा सामन्यांत १३ गुण

एटीकेएमबीचा सहा सामन्यांतील हा चौथा विजय असून एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १३ गुण झाले. आघाडीवरील मुंबई सिटी एफसीला त्यांनी गुणांवर गाठले. ६ (९-३) गोलफरकामुळे मुंबई सिटी आघाडीवर आहे. एटीकेएमबीचा गोलफरक ४ (७-३) असा दोनने कमी आहे. गोव्याला सहा सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला असून दोन विजय व दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे आठ गुण व सहावे स्थान कायम राहिले. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (६ सामन्यांतून १०) दुसर्‍या, तर बेंगळुरू एफसी (५ सामन्यांतून ९) चौथ्या क्रमांकावर आहे.