भारताची आजपासून ‘कसोटी’

ऑस्ट्रेलियाशी करणार दोन हात : अ‍ॅडलेड येथे दिवस-रात्र सामना


16th December 2020, 10:20 pm
भारताची आजपासून ‘कसोटी’

फोटो : चषकासमवेत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन.

अ‍ॅडलेड : भारत-ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेला गुरुवार, १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून अ‍ॅडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात ही लढत खेळवली जाणार आहे. इतिहासाचा अभ्यास केला असता या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला जीव ओतून खेळावे लागेल.

गुलाबी चेंडूवर भारतीय संघ

गुलाबी चेंडूवर आतापर्यंत भारतीय संघ फक्त एक सामना खेळला आहे. तोही मायदेशात. गेल्या वर्षी कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर भारत-बांगलादेश यांच्यात पहिला सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलिया अजिंक्य

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक सात दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावर कांगारूंचा पराभव करणे कठीण आहे. गुलाबी चेंडूवरील एकाही सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झलेाला नाही. यजमान संघाला घरच्या मैदानाचा फायदा होणारच आहे. त्याशिवाय सात कसोटी सामन्यांतील अनुभवही त्यांच्यापाठीशी आहे. त्यामुळेच दिवस-रात्र सामन्यात भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे.

आतापर्यंत १४ आंतरराष्ट्रीय दिवस-रात्र कसोटी सामने झाले आहेत. त्यांपैकी ऑस्ट्रेलियाने सात सामने खेळले आहेत. अ‍ॅडलेड येथील मैदानावर पहिला सामना झाला होता. त्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर मात केली होती. त्याच मैदानावर आता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे.

कमकुवत आणि जमेच्या बाजू 

भारत : मागील यशात चेतेश्वर पुजाराची सातत्यपूर्ण कामगिरी आणि वेगवान मारा हे घटक महत्त्वाचे ठरले होते. आगामी मालिकेपूर्वी दोन सराव सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या फलंदाजीची मदार पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहलीवर असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवेल. वेगवान मार्‍याची भिस्त जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर आहे.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर पहिल्या कसोटीत खेळणार नसला तरी उर्वरित मालिकेसाठी तो उपलब्ध आहे. त्यामुळे धावांसाठी झगडणार्‍या जो बर्न्ससह सलामीची चिंता सतावते आहे. चिवट फलंदाजी करणारा मार्नस लबूशेन तारणहार आहे. फक्त १४ कसोटी सामन्यांत त्याने ६३.४३च्या सरासरीने १,४५९ धावा केल्या आहेत. पॅट कमिन्स आणि नॅथन लिऑन घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात पटाईत आहेत.

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना

भारताचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी बुधवारी पहाटे ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. इन्स्टाग्रामवरून त्यानेच ही माहिती दिली आहे. आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियातील मर्यादित षटकांच्या सामन्याला मुकला होता. एनसीएमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर तो दुबईमार्गे ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्याला १४ दिवस क्वारंटाइन रहावे लागणार आहे. २९ तारखेला त्याचा क्वारंटाइन कालावधी संपेल. त्यानंतर तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध असणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे.

बॉक्स

भारतीय संघ : मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह.