खनिज चोरीचा आरोप सिद्ध करा

मंत्री मिलिंद नाईक यांचे काँग्रेसला आव्हान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th November 2020, 11:56 pm
खनिज चोरीचा आरोप सिद्ध करा

पणजी : मुरगाव पोर्ट ट्रस्टवरील (एमपीटी) खनिजाची चोरी केल्याचा आपल्यावरील आरोप काँग्रेसने सिद्ध करून आपल्यास तुरुंगात डांबून दाखवावे, असे आव्हान मंत्री मिलिंद नाईक यांनी बुधवारी दिले.
काँग्रेसचे पदाधिकारी वारंवार आपल्यावर विविध आरोप करीत असतात, पण आतापर्यंत त्यांनी एकही आरोप सिद्ध करून दाखवलेला नाही. एमपीटीवर पडून असलेल्या खनिजाचा लिलाव झालेले आहे. त्याची चोरी होत असेल तर ती जबाबदारी न्यायालयाची आहे. पण आपण असे बेकायदेशीर काम कधीही केलेले नाही किंवा करतही नाही. त्यामुळे काँग्रेसने आपल्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवले पाहिजेत, असे मंत्री नाईक म्हणाले.
एमपीटीवर आपला खनिज निर्यातीचा व्यवसाय चालतो. त्याची ज्यांना माहिती हवी आहे त्यांनी आपल्या वास्को येथील कार्यालयात यावे. आपल्या व्यवसायाची पूर्ण माहिती आपण त्यांना देऊ शकतो. काँग्रेसने केलेल्या आरोपांसंदर्भात पुढील दोन दिवसांत आपण स्पष्टीकरणही देणार आहे, असेही मंत्री मिलिंद नाईक यांनी सांगितले.

लोकांना कोळसा नव्हे, प्रदूषण नको!
कोळसा हाताळणी प्लांट ज्या भागांत आहेत, त्या भागातील नागरिकांनी कोळसाविरोधी आंदोलनांत अजिबात सहभाग घेतलेला नाही. त्यांना कोळसा नको असे नाही, केवळ प्रदूषण नको. कोळसा हाताळणीमुळे सद्यस्थितीत सुमारे बाराशेपेक्षा अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे कोळसा हाताळणी तत्काळ बंद करता येणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आधीही जाहीर केले आहे. पुढील काही दिवसांत मुख्यमंत्रीच कोळशाबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही मंत्री मिलिंद नाईक यांनी नमूद केले.       

हेही वाचा