जोया धबक प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

चौकशी करून अहवाल सादर करण्याचे गोमेकॉच्या डीनना निर्देश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th November 2020, 11:52 pm
जोया धबक प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

पणजी : चिंबलमध्ये सर्पदंशाने मृत्यू झालेल्या जोया धबक या मुलीच्या प्रकरणाची बुधवारी खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दखल घेतली आहे. जोयाच्या कुटुंबीयांनी गोमेकॉतील डॉक्टरांना लक्ष्य केल्याने मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना जोयावरील उपचारांसंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनीच यासंदर्भातील माहिती दिली. जोयाला सर्पदंश झाल्यानंतर तिला बुधवारी दुपारीच गोमेकॉत उपचारांसाठी दाखल केले होते. पण, तेथील डॉक्टरांनी जोयावर उपचार करण्यात हलगर्जीपणा केला. त्यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप जोयाच्या आई-वडिलांनी मंगळवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना केला होता. त्यासंदर्भातील वृत्त बुधवारी ‘गोवन वार्ता’मध्ये प्रसिद्ध झाले. या प्रकरणाबाबत आपण बुधवारीच डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना अहवाल सादर करण्याचे तसेच चौकशीचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, गोवा वेल्हा येथील इमॅक्युलेट हर्ट ऑफ मेरी हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या जोया धबक या चिंबलमधील १३ वर्षांच्या मुलीला गेल्या बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास चिंबलमध्येच सापाने दंश केला. त्यानंतर तिच्या मावशीने तिला तत्काळ गोमेकॉतील १० क्रमांकाच्या वॉर्डमध्ये उपचारांसाठी दाखल केले. तेथे तिला सर्पदंश झाल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे उपचारांसाठी तिला १३५ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये हलविण्यात आले, पण करोना चाचणीचा नकारात्मक अहवाल येईपर्यंत कोणतेही उपचार न करण्याचा निर्णय तेथील डॉक्टरांनी घेतला. या दरम्यान आधारकार्ड तसेच इतर कागदपत्रांची पुर्तताही करून घेतली, पण उपचार सुरू केले नाहीत. अखेर बुधवारी रात्री १०.३० वाजता जोयाचा अहवाल नकारात्मक असल्याचा अहवाल आल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू केले गेले. पण, तोपर्यंत फार उशीर झाला. सर्पदंश झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर डॉक्टरांनी तत्काळ उपचार केले असते, तर जोया निश्चित वाचली असती. पण डॉक्टरांनी तिच्या जिवापेक्षा करोना चाचणी महत्त्वाची ठरवली. अखेर चाचणीचा अहवाल नकारात्मक आला, पण तोपर्यंत जोया मृत्यूच्या दाढेत पोहोचली होती, असा दावा तिची आई आयशा यांनी केला होता.
डॉक्टरांकडून उपचारांत टाळाटाळ झाली, जोयाचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न त्यांनी केले नाहीत, इंजेक्शन, सलाईन, ऑक्सिजन पुरवला नाही, ११३ क्रमांकाच्या वॉर्डमध्येच जोया मृत झाली होती. नंतर तिला आयसीयूमध्ये दाखल केल्याचे दाखवण्यात आले, त्यानंतर अचानक पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी जोया मृत झाल्याचे घोषित करण्यात आले, असे आरोपही आयशा यांनी केले होते.


डॉक्टरांकडून स्पष्टीकरण मागवले : डीन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निर्देशांनंतर जोया धबक मृत्यू प्रकरणाची आपण चौकशी सुरू केली आहे. जोयावर उपचार केलेल्या डॉक्टरांकडून लेखी स्पष्टीकरणही मागविण्यात आले आहे. डॉक्टरांकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

हेही वाचा