मुंबई सिटीचा गोव्याला धक्का

अॅडमचा पेनल्टीवरील गोल निर्णायक : एफसी गोवावर १-०ने मात


25th November 2020, 11:12 pm

फातोर्डा : सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी मुंबई सिटी एफसीने एफसी गोवा संघावर १-० असा विजय मिळविला. इंग्लंडचा स्ट्रायकर अॅडम ली फाँड्रे याने पेनल्टी सत्कारणी लावत केलेला गोल निर्णायक ठरला.
गोव्याच्या फातोर्डा स्टेडियमवर झालेल्या आयएसएलच्या ७व्या सामन्यात पहिल्या सत्रात ४०व्या मिनिटापासून दहा खेळाडूंनिशी खेळावे लागलेल्या गोव्याला झुंजार प्रयत्न करूनही पराभव टाळता आला नाही. यात मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने चोख कामगिरी पार पाडली. या निकालामुळे मुंबईचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी आपल्या आधीच्या क्लबला शह देत पहिला विजय नोंदविला.
पाच मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतील तिसऱ्या मिनिटास मुंबईच्या सी गोडार्ड याने उजवीकडून गोलक्षेत्रात मुसंडी मारत गोव्याच्या दोन बचावपटूंना चकविले. त्याच्या क्रॉस शॉटवर बदली खेळाडू बिपीन सिंगने हेडिंग केले. त्यावेळी चेंडू गोव्याचा मध्यरक्षक लेनी रॉड्रीग्ज याच्या हाताला लागला. गोलक्षेत्रात हे घडल्यामुळे पंच राहुलकुमार गुप्ता यांनी मुंबईला पेनल्टी बहाल केली. त्यावर अॅडमने गोल केला.
पहिल्या सत्रात पाच मिनिटांचा खेळ बाकी असताना गोव्याचा एक खेळाडू कमी झाला. गोव्याचा मध्यरक्षक रेडीम ट्लांग याने मुंबईचा मध्यरक्षक हर्नान सँटाना याला रोखले. चेंडूवर ताबा मिळवून हर्नान आगेकूच करीत असतानाच रेडीमने त्याला नियमबाह्य पद्धतीने रोखले. त्यामळे रेडीमला पंच राहुलकुमार गुप्ता यांनी लाल कार्ड दाखवून बाहेर काढले. त्याआधीच्याच म्हणजे ३९व्या मिनिटाला हर्नान याला गोव्याचा मध्यरक्षक अल्बर्टो नोग्युराने पाडले होते. तिसऱ्या मिनिटाला रेडीमने मुंबईचा बचावपटू अमेय रानवडेला चकवून चेंडूवर ताबा मिळवित आगेकूच केली होती, पण प्रतिस्पर्धी मध्यरक्षक सी गोडार्ड याने त्याला रोखले.
पाचव्या मिनिटाला गोव्याचा बचावपटू इव्हान गोंझालेझ याने मारलेला चेंडू मुंबईचा मध्यरक्षक फारुख चौधरीने थोपविला. मग चेंडू गोलक्षेत्रात गेला, पण गोव्याच्या सुदैवाने गोलरक्षक महंमद नवाझ याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आठव्या मिनिटाला सामन्यातील पहिला कॉर्नर गोव्याला मिळाला. स्ट्रायकर इगोर अँग्युलो याने घेतलेल्या कॉर्नरवर चेंडू गोलक्षेत्रात गेला. त्यावर मध्य फळीतील अल्बर्टो नोग्युराने मारलेला फटका मात्र अकारण जास्त ताकदवान होता. त्यामुळे चेंडू त्याच्यापासून दूर गेला, जो मुंबईचा बचावपटू सार्थक गोलुईने बाहेर घालविला. त्यातून पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर विशेष काही घडले नाही.
दुसऱ्या सत्रात प्रारंभी मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने दमदार बचावाचे प्रदर्शन केले. ५६व्या मिनिटाला गोव्याचा मध्यरक्षक लेनी रॉड्रीग्ज याने उजवीकडून आगेकूच केली आणि चेंडू गोलक्षेत्रात मारला. मुंबईचा बचावपटू मुर्तडा फॉल याने तो थोपविला, पण चेंडू सहा यार्ड बॉक्समध्येच होता. गोव्याचा बचावपटू इव्हान गोंझालेझ याने प्रयत्न केला, पण अमरींदरने क्षणार्धात उजवीकडे जात ही चाल रोखली. तीन मिनिटांनी म्हणजे ५९व्या मिनिटाला मुंबईने नेटच्या दिशेने पहिला फटका मारला. ह्युगो बुमूस याला गोलक्षेत्रात चेंडू मिळाला. उजवीकडे हालचाल करीत त्याने प्रयत्न केला, पण नवाझने अचानक उसळलेला चेंडू नीट अडविला.