नॉर्थईस्टला ब्लास्टर्सविरुद्ध आज कडव्या आव्हानाची अपेक्षा


25th November 2020, 11:11 pm

पणजी : सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) गुरुवारी जीएमसी स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि केरला ब्लास्टर्स यांच्यात लढत होईल. स्वप्नवत सुरुवातीनंतर नॉर्थईस्टला या लढतीत कडव्या आव्हानाची अपेक्षा असेल.
नॉर्थईस्टने सलामीच्या सामन्यात मुंबई सिटी एफसीला पराभवाचा धक्का दिला. जेरार्ड न्यूस यांच्या संघाचा प्रभावी वाटचाल कायम राखण्याचा निर्धार असेल. नॉर्थईस्टचा चिवट बचाव कौतुकास्पद ठरला. ब्लास्टर्सला पहिल्या लढतीत एटीके मोहन बागानविरुद्ध पराभूत व्हावे लागले. त्या लढतीत नेटच्या दिशेने ब्लास्टर्सला एकही फटका मारता आला नाही. अशावेळी आपले बचावपटू चांगली कामगिरी कायम राखतील अशी न्यूस यांना अपेक्षा असेल.
ब्लास्टर्सविरुद्ध मागील चार सामन्यांत नॉर्थईस्ट अपराजित राहिला आहे आणि ही बाब न्यूस यांचा आत्मविश्वास आणखी वाढवणारी आहे. यानंतरही न्यूस यांना चुरशीच्या लढतीची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, आयएसएलमधील एक सर्वोत्तम संघ ब्लास्टर्सकडे आहे. त्यांच्याविरुद्ध खेळणे अवघड असते. चालींची बांधणी, मैदानावरील संघटन आणि सेट-पिसेसवरील कौशल्य यांत ते चांगले आहेत. ते अनेक प्रकारे गोल करू शकतात. त्यामुळे हा सामना अवघड ठरेल. पहिल्या सामन्यात त्यांचा खेळ पराभूत होण्याइतका वाईट नव्हता. त्यांचा संघ पुन्हा एकदा चांगला फुटबॉल खेळणार आहेत.
ब्लास्टर्सचे प्रशिक्षक किबू व्हिकूना यांना आपला प्रतिस्पर्धी किती भक्कम आहे याची कल्पना आहे आणि याबाबत ते कोणत्याही भ्रमात नाहीत. ते म्हणाले की, मुंबई सिटीविरुद्ध नॉर्थईस्टने फार चांगला खेळ केला. त्यांचा संघ फार चांगला आहे. हा संघ नक्कीच भक्कम असेल आणि आमच्यासमोर कडवे आव्हान असेल.
गेल्या मोसमात ब्लास्टर्स आणि नॉर्थईस्ट यांची बचावातील आकडेवारी लिगमध्ये सर्वांत खराब ठरली. दोन्ही संघ प्रत्येकी तीनच सामन्यांत क्लीन शीट राखू शकले. नॉर्थईस्ट यातून सावरल्याचे दिसत आहे, पण ब्लास्टर्ससाठी जुन्या समस्याच डोकेदुखी ठरल्या आहेत. एटीके मोहन बागानविरुद्ध त्यांना पत्करावा लागलेला गोल बचावातील चुकीमुळे झाल्याचेही व्हिकूना यांनी सांगितले.
वेळेगणिक आम्ही सरस खेळ करू
ब्लास्टर्सचे प्रशिक्षक किबू व्हिकूना यांना या सामन्यातील आघाडीवर सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. आपल्या संघाची जडणघडण सुरू असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, संघ स्थिरावण्यास वेळ लागतो आणि आमची ती प्रक्रिया सुरू आहे. वेळेगणिक आम्ही सरस खेळ करू. कामगिरी उंचावू. आमच्याकडे परदेशी आणि भारतीय असे बरेच नवे खेळाडू आहेत. त्यामुळे एक फुटबॉल संघ म्हणून आमची ओळख निर्माण करण्यास वेळ लागेल.